Top News

सर्वोच्च त्यागासाठी सज्ज रहा- मारोतराव कन्नमवार, दिवंगत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, दि.१५ आगस्ट १९६३ रोजी स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र राज्याच्या जनतेला दिलेला संदेश

सर्वोच्च त्यागासाठी सज्ज रहा- मारोतराव कन्नमवार, दिवंगत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, दि.१५ आगस्ट १९६३ रोजी स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र राज्याच्या जनतेला दिलेला संदेश



विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ

भारतातील इतर राज्याप्रमाणेच, महाराष्ट्र राज्य यंदाचा स्वातंत्र्यदिन आपल्या राष्ट्राच्या इतिहासातील अतिशय आणीबाणीच्या प्रसंगी साजरा करीत आहे. आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यातील सर्व प्रकारची साधने, मनुष्यबळ आणि इतर सामुग्री एकत्रित करण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त उत्पादनाचा पहिल्या सहा महिन्यांचा कार्यक्रम आखण्यात येऊन तो पुरा करण्यात आला आणि आता दुसऱ्या सहामाहीचा कार्यक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षण निधीमध्ये उल्लेखनीय अशी भर घालण्यात आलेली असून, औद्योगिक व कृषीविषयक उत्पादन वाढविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत बऱ्याचशा गोष्टी साध्य करण्यात आलेल्या असल्या तरीही आपल्याला अजून पुष्कळ कार्य करावयाचे आहे.

           प्रत्येक भारतीय नागरीक, मग तो कोणत्याही व्यवसायात वा क्षेत्रात असो, सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत राष्ट्राचा सैनिक आहे याची त्याने जाणीव ठेवली पाहिजे. शिस्तबद्ध सैनिक या नात्याने प्रत्येक स्त्री-पुरुषांने राष्ट्रीय एकसंघता तसेच आर्थिक सुस्थिती व लष्करी सामर्थ्य वाढविणे यामधील आपला वाटा उचलला पाहिजे. या प्रचंड कार्यामध्ये प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या अथवा बालकांच्याही कार्याचे फार मोल आहे. संरक्षण प्रयत्नांमध्ये भर घालून आपण आपल्या आवडत्या पंतप्रधानांचे हात बळकट करू आणि जगाला हे दाखवून देऊ की, शांततेच्या काळात राष्ट्रउभारणीचे कार्य करण्याची क्षमता तर आमच्यात आहेच पण त्याबरोबर आक्रमाला पिटाळून लावण्याचे सामर्थ्यही आमच्या मनगटात आहे.

           आजच्या परम मंगल दिवशी आपल्या लोकशाहीचे व आपल्या लोकशाही जीवनपरंपरेचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवित समर्पण करण्याची पुन्हा एकवार प्रतिज्ञा करू या आणि आपल्या राष्ट्राचा स्वाभिमान कायम राखण्यासाठी जीवनातील सर्वोच्च त्याग करण्याकरिता सुसज्ज होऊ या.

गजानन रमेशराव चंदावार, रा. वणी, जि. यवतमाळ 

प्रचारक - कर्मवीर दादासाहेब कन्नमवार प्रचार व प्रसार समिती, महाराष्ट्र राज्य 8888422662

Previous Post Next Post