Top News

पहिली सोलर टाकी कोसळूनही नगरपरिषदेला जाग नाही; दोन दिवसांत दुसरी दुर्घटना! नागभीडकरांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार? — गटनेते गणेश तर्वेकर

नागभीडकरांच्या जीवाशी खेळ कधी थांबणार? — गटनेते गणेश तर्वेकर





नागभीड : नागभीड नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात आलेल्या सोलर पाणी टाक्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अवघ्या दोन दिवसांच्या कालावधीत दोन सोलर पाणी टाक्या आणि त्यांचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळल्याच्या घटनांमुळे नगरपरिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

15 सप्टेंबर 2026 रोजी बिक्केवार चौकातील सोलर पाणी टाकी, सोलर पॅनल आणि लोखंडी स्ट्रक्चर कोसळले होते. या घटनेनंतर शहरातील इतर सोलर पाणी टाक्या व त्यांच्या स्ट्रक्चरची तातडीने तांत्रिक तसेच सुरक्षा तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, पहिल्या घटनेला दोन दिवस पूर्ण होण्यापूर्वीच प्रभाग क्रमांक 8 मध्ये नव्याने बसविण्यात आलेली आणखी एक पाण्याची टाकी व तिचे स्ट्रक्चर कोसळल्याची घटना समोर आली.

सुदैवाने दोन्ही घटनांमध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, संबंधित परिसरातून नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांची नियमित ये-जा होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पहिल्या घटनेनंतर सुरक्षा तपासणी झाली का?

पहिली सोलर पाणी टाकी कोसळल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने शहरातील सर्व सोलर पाणी टाक्यांचे सेफ्टी ऑडिट किंवा तांत्रिक तपासणी केली होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तपासणी झाली असल्यास त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात यावा आणि तपासणी झाली नसेल तर त्यामागचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी होत आहे.

एकामागोमाग एक टाक्या कोसळत असताना केवळ सुदैवाने जीवितहानी टळत आहे. मात्र नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत अशा प्रकारची जोखीम किती काळ स्वीकारली जाणार, असा सवालही उपस्थित होत आहे.

नगराध्यक्षा आणि पाणीपुरवठा सभापतींच्या भूमिकेवर प्रश्न

पहिल्या दुर्घटनेनंतर नगराध्यक्षा आणि पाणीपुरवठा सभापती यांनी कोणती कार्यवाही केली, प्रशासनाकडे कोणता पाठपुरावा केला आणि शहरातील उर्वरित सोलर पाणी टाक्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणते निर्देश देण्यात आले, याची माहिती नागरिकांसमोर येणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.

केवळ प्रतिक्रिया देणे किंवा प्रशासनाला सूचना करण्यापुरतीच लोकप्रतिनिधींची जबाबदारी मर्यादित आहे का, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

सर्व सोलर टाक्यांचे तातडीने सेफ्टी ऑडिट करण्याची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागभीड नगरपरिषदेचे गटनेते गणेश तर्वेकर यांनी केली आहे.

नगरपरिषद क्षेत्रातील सर्व सोलर पाणी टाक्यांचे तातडीने तांत्रिक व सुरक्षा परीक्षण करण्यात यावे. तसेच संबंधित कामांची निविदा, वर्क ऑर्डर, अंदाजपत्रक, तांत्रिक मंजुरी, मोजमाप पुस्तिका, वापरण्यात आलेले साहित्य, गुणवत्ता तपासणी अहवाल, काम पूर्णत्व प्रमाणपत्र आणि कंत्राटदाराला करण्यात आलेली देयके यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ही कामे मंजूर आराखडा, तांत्रिक निकष आणि नियमानुसार करण्यात आली आहेत की नाही, याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी : तर्वेकर

महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील संबंधित तरतुदींनुसार नगरपरिषदेच्या कामांची व मालमत्तेची तपासणी तसेच आवश्यक अहवाल व माहिती मागविण्याची तरतूद असल्याचा दाखला देत, सलग दोन दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नगरपरिषदेकडून संपूर्ण अहवाल मागवून आवश्यक असल्यास प्रत्यक्ष तांत्रिक चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी गटनेते गणेश तर्वेकर यांनी केली आहे.

“सर्व सोलर पाणी टाक्या तात्काळ उतरवाव्यात”

गटनेते गणेश तर्वेकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नागभीड शहरातील सर्व सोलर पाणी टाक्या तात्काळ उतरविण्यात याव्यात. संबंधित कंत्राटदाराची सखोल चौकशी करून दोष आढळल्यास त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत. नागरिकांच्या जीवाशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.”

दरम्यान, सलग दोन सोलर पाणी टाक्या कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासन आता कोणती भूमिका घेते आणि शहरातील इतर सोलर टाक्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणती उपाययोजना केली जाते, याकडे नागभीडकरांचे लक्ष लागले आहे.



Previous Post Next Post