नागपूर अधिवेशनावर 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांचा निर्धार
नागभीड | प्रतिनिधी : धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांनी गुरुवारी नागभीड तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले. खरीप हंगाम 2025 मधील धानासाठी प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस, बोनसची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे आणि शेतीसाठी 24 तास वीजपुरवठा उपलब्ध करून देणे, या मागण्यांसाठी हजारो शेतकरी ट्रॅक्टर घेऊन नागभीड तहसील कार्यालयावर दाखल झाले.
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या नेतृत्वाखाली 17 सप्टेंबर रोजी हा मोर्चा काढण्यात आला. तळोधी-बाळापूर येथून निघालेला शेतकऱ्यांचा ताफा नागभीडकडे मार्गस्थ होत असताना रस्त्यावर ट्रॅक्टरच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. 300 पेक्षा अधिक ट्रॅक्टरसह मोठ्या संख्येने दुचाकीस्वारही या आंदोलनात सहभागी झाले.
घोषणांनी दुमदुमला नागभीडचा परिसर
साई मंदिर देवस्थान परिसरातून मोर्चाला प्रारंभ झाला. तालुक्यातील विविध गावांमधून शेतकरी सकाळपासूनच ट्रॅक्टरसह येथे दाखल झाले होते. मागण्यांचे फलक घेऊन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
‘धान बोनस आमचा हक्क’ या घोषणेसह विविध मागण्यांचा आवाज नागभीड शहरापर्यंत पोहोचला. आंदोलनात महिला शेतकऱ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला.
मुसळधार पाऊस आला, पण आंदोलन थांबले नाही
मोर्चा तहसील कार्यालयाच्या परिसरात पोहोचल्यानंतर पावसाने जोर धरला. काही वेळातच अनेक शेतकरी पूर्णपणे भिजले. मात्र, पावसामुळे आंदोलनाची तीव्रता कमी झाली नाही. शेतकऱ्यांनी जागेवरच थांबून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे खराब हवामानातही आंदोलनातील उपस्थिती आणि शेतकऱ्यांचा उत्साह कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
तहसीलदार महेश देशमुख यांनी स्वीकारले निवेदन
मोर्चानंतर शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार महेश देशमुख यांच्याकडे मागण्यांचे निवेदन सादर केले. विशेष म्हणजे निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार देशमुख स्वतः पावसात मंचावर आले. मुसळधार पावसामुळे तेही भिजले; मात्र त्यांनी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. यावेळी नागभीड पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
धान उत्पादकांसमोर वाढता उत्पादन खर्च
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधफवारणी, मजुरी तसेच सिंचनाचा खर्च वाढत चालला आहे. दुसरीकडे धानाच्या बाजारभावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक अडचणी यामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यातील तफावत वाढत असल्याचे शेतकऱ्यांनी मांडले.
यामुळे खरीप 2025 मधील धानासाठी हेक्टरी 20 हजार रुपयांचा बोनस तातडीने मंजूर करून त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.
24 तास वीजपुरवठ्याचीही मागणी
धान बोनसव्यतिरिक्त शेतीसाठी अखंडित 24 तास वीजपुरवठा मिळावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. शेतीशी संबंधित इतर प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी शेतकरी प्रतिनिधींनी केली.
मागण्या मान्य न झाल्यास नागपूरकडे कूच
आंदोलनाला संबोधित करताना शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने पाहण्याची मागणी केली. मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्यास आगामी नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 1 लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागभीडमधील या आंदोलनामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
आंदोलनात विविध पदाधिकाऱ्यांचा सहभाग
या मोर्चात माजी जिल्हा परिषद सदस्य खोजराम मरस कोल्हे, लक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष विनोद बोरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मा कांबळी, विनोद नवघडे, गिरीश नवघडे, प्रफुल्ल खापरडे, सुनीता डोईजड, नगरसेवक नयना गेडाम, माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिता खापर्डे, नगराध्यक्ष कृष्णा गंदेवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.तुकाराम निकुरे, रमेश बोरकर, धनंजय बोरकर, संजय गहाणे, गिरीश नवघाडे, दिवाकर कामडी, अतुल सिद्धमाशेट्टीवार, अतिश भाकरे, भूपेश भाकरे, विलास घोनमोडे यांच्यासह तालुक्यातील अनेक गावांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

