नागभीड | जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि. ४) नागभीड तहसील कार्यालयाला भेट देऊन महसूल विभागाच्या विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्रे वेळेत आणि सुलभ पद्धतीने मिळावीत, यासाठी आवश्यक सुधारणा व उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकांना शासकीय सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने उपलब्ध करून देण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
जमिनीच्या डिजिटायझेशन प्रक्रियेबाबत ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. या प्रक्रियेला गती देणे, महसुली नोंदी अचूक ठेवणे, पारदर्शकता राखणे आणि नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यानंतर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी नागभीड येथील शासकीय धान्य गोदाम तसेच नवीन तहसील कार्यालयाच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाची गुणवत्ता राखून विहित मुदतीत काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
याशिवाय नगर परिषद नागभीड अंतर्गत सुरू असलेल्या 'नमो उद्यान' प्रकल्पालाही त्यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.
या दौऱ्यावेळी प्रभारी तहसीलदार उमेश कावळे, अपर तहसीलदार शेखर पुणसे, नायब तहसीलदार नरेश बोधे व स्मिता भैसारे, गट विकास अधिकारी स्नेहल लाड, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख, उपअधीक्षक भूमी अभिलेख वंदना नाईक, तालुका कृषी अधिकारी शिवकुमार पुजारी, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल गव्हारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादूरकर, निरीक्षण अधिकारी चांदेकर, पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
