Top News

Virur Station Cleanliness Drive: श्रमदानातून युवकांचा अनोखा उपक्रम, ग्रामपंचायतीचा गौरव





विरूर स्टेशन |  विरूर स्टेशन गावातील जागरूक व सुशिक्षित तरुण मंडळींनी एकत्र येऊन श्रमदानातून हाती घेतलेला स्वच्छता उपक्रम अत्यंत स्तुत्य, कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरत आहे. गावातील तरुण स्वतःहून झाडू हातात घेऊन परिसर स्वच्छ करत असून, ही बाब ग्रामपंचायतीसाठी किंवा गावासाठी लाजीरवाणी नसून 'आपले गाव, आपली जबाबदारी' या लोकसहभागाच्या भावनेची आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 'ग्रामसफाई' संदेशाची जिवंत प्रचीती असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने म्हटले आहे.

या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व युवा सैनिकांचे ग्रामपंचायत प्रशासनाने मनापासून अभिनंदन करत त्यांच्या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले आहे.


युवा शक्तीचा जाहीर गौरव

विशाल देरकर, नानी राठोड, प्रेम श्रीकोंडावार, संस्कार निमलवार, शुभम भोस्कर, रोहन सोनी, श्रावण रेड्डी, करण कहार, अस्मित बोडेकर, स्नेहल मोरे, प्रतीक मोरे, साहिल अलोने, चेतन वरवाडे, अनिकेत चोचले, परिवर जीव तोडे, संजू वर्मा, आदित्य वर्मा, विकी सोनी, शीतिज तुराणकर, प्रवीण नांदेकर, पवन सोनी, प्रतीक मोरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या श्रमदानाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.

ग्रामपंचायत विरूर स्टेशन ही नेहमीच गावाच्या आरोग्यासाठी व स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून, दैनंदिन कचरा संकलन व साफसफाईसाठी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन कचराकुंड्यांची उभारणी तसेच घंटागाडी (कचरा गाडी) नियमित सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी कातकर यांनी दिली.

नागरिकांची आणि तरुणांची मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायत लवकरच विशेष स्वच्छता मोहीम राबविणार असून, ज्या भागात कचराकुंडीची तातडीची गरज आहे त्या ठिकाणी नवीन कचराकुंडी व कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत ही कुठल्याही एका संस्थेची किंवा कर्मचाऱ्यांची नसून संपूर्ण गावाची असते. लोकसहभागाशिवाय कोणतेही गाव पूर्णपणे स्वच्छ राहू शकत नाही. तरुणांनी दाखवलेली ही दिशा निश्चितच अभिनंदनीय असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील युवा पिढी आता हातात हात घालून विरूर स्टेशनला चंद्रपूर जिल्ह्यातील 'आदर्श व स्वच्छ गाव' बनवण्यासाठी एकत्रितपणे काम करणार आहे.

गावातील नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामसेवकांनी केले आहे. नागरिकांकडून सुरू असलेल्या स्वच्छतेच्या कामाचे त्यांनी कौतुक करत ग्रामपंचायतही गावासाठी प्रभावीपणे काम करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आगामी काळात गावातील स्वच्छता अभियान अधिक प्रभावीपणे राबविले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post