नागभीड : मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीद्वारे संचालित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षण प्रवेश व स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची देशपातळीवर पुन्हा एकदा छाप उमटविली आहे.
महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनी जान्हवी लीलाधर कुंभलवार व जान्हवी मारोती लटारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे एम.एस्सी. (भौतिकशास्त्र) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तसेच रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थी क्रिश पोहकर याने केंद्रीय विद्यापीठ, पंजाब येथे एम.एस्सी. (रसायनशास्त्र) अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला असून युगल कापसे याची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.एस्सी. (रसायनशास्त्र) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
विशेष म्हणजे युगल कापसे व जान्हवी लीलाधर कुंभलवार यांनी देशातील प्रतिष्ठित आयआयटी-जॅम परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होत महाविद्यालयाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव वाढविला आहे.
महाविद्यालयात बी.एस्सी.च्या प्रथम वर्षापासूनच आयआयटी-जॅम, केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा तसेच इतर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन, अभ्यास साहित्य, विशेष व्याख्याने आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते. या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे दरवर्षी अनेक विद्यार्थी देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवत उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करीत आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे सचिव मनोज वनमाळी, संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय डॉ. विकास मोहतुरे, प्रा. निलेश गोडे, डॉ. मनीष मते, डॉ. अतुल नागपुरे, प्रा. श्रीकांत वनमाळी तसेच भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाला दिले.
महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे विश्वासार्ह केंद्र म्हणून सातत्याने नावलौकिक मिळवत असल्याचे या यशातून पुन्हा अधोरेखित झाले.
