धारावी परिसरातील ५० हून अधिक मुलांसाठी सपोर्ट विंग्स आणि हुनर सीखो या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि स्व-अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमात सपोर्ट विंग्सचे १० स्वयंसेवक सहभागी झाले.
हुनर सीखो संस्थेचे संस्थापक सद्दाम मन्सुरी यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात युवा इन्फ्लुएन्सर जय मल्होत्रा यांनी मुलांसोबत विविध मनोरंजक उपक्रम राबवले. मुलांना एकमेकांची चित्रे काढण्यास सांगण्यात आले. या उपक्रमातून त्यांच्या कल्पकतेला वाव मिळाला तसेच आत्मविश्वास वाढीस लागला.
यानंतर जय मल्होत्रा यांनी मुलांना ट्रेंडिंग डान्स शिकवून त्यांच्यासोबत सादरीकरण केले. संपूर्ण परिसर आनंद, उत्साह आणि टाळ्यांच्या गजराने दुमदुमून गेला.
'आर्टसी बाय अलीना' यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आपल्या भविष्यातील स्वप्नांचे प्रतीक म्हणून झाडाचे चित्र रेखाटून त्यावरील फळांमध्ये आपली ध्येये आणि आकांक्षा व्यक्त केल्या. या उपक्रमातून "स्वप्ने जिद्द आणि मेहनतीनेच पूर्ण होतात" हा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान सर्व मुलांना फ्रुटीचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांच्या जीवनातील संघर्ष, आशा आणि स्वप्नांवर आधारित माहितीपटाचे चित्रीकरणही करण्यात आले. यावेळी एका चिमुकलीने "मोठे होऊन आई-वडिलांना आधार द्यायचा आणि गरजूंची मदत करायची," अशी भावना व्यक्त केली. तिच्या या निरागस विचारांनी उपस्थित सर्वजण भावूक झाले.
सपोर्ट विंग्सच्या संचालिका पूर्वा खंडाडे म्हणाल्या, "प्रत्येक मुलाला मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळाली पाहिजे. योग्य प्रोत्साहन मिळाल्यास ही मुले समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात. अशा उपक्रमांद्वारे आम्ही त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देण्याचे काम करत आहोत."
या उपक्रमातून मुलांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सकारात्मक विचारांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.


