मतदार यादी कामात हलगर्जीपणा; चंद्रपूरातील शिक्षक निलंबित
चंद्रपूर : मतदारयादीची तयारी, पुनरावलोकन आणि दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी सरस्वती विद्या मंदिर, नकोडा येथील सहायक शिक्षक आदर्श उत्तम दुधगवळी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वसुमान पंत यांनी हा आदेश जारी केला.
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मतदारयादीत नियमानुसार नावे समाविष्ट करणे किंवा वगळणे या अधिकृत कामात संबंधित शिक्षकांनी टाळाटाळ, निष्काळजीपणा आणि हयगय केल्याचे आढळून आले. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.
यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 च्या कलम 13 (AA) तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत अधिकारांचा वापर करून आदर्श दुधगवळी यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले.
मुख्यालय सोडण्यास बंदी
निलंबन कालावधीत संबंधित शिक्षकांचे मुख्यालय निश्चित करण्याचे अधिकार शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर यांना देण्यात आले आहेत. तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
खाजगी नोकरी किंवा व्यवसायास मनाई
महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम 1979 मधील नियम 16 नुसार निलंबन कालावधीत कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. आदेशाचे उल्लंघन झाल्यास पुढील शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तसेच निर्वाह भत्त्यावरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
