Top News

नागभीड तालुक्यात ग्रामसभेचा आदर्श: मस्टर बंद असतानाही श्रमदानातून 2800 फळझाडे व बांबू लागवड वाचवली

 नागभीड तालुक्यात ग्रामसभेचा आदर्श: मस्टर बंद असतानाही श्रमदानातून 2800 फळझाडे व बांबू लागवड वाचवली 




नागभीड :: नागभीड तालुक्यातील किटाडी मेंढा, कोरंबी आणि कसरला या गावांनी प्रशासनिक अडचणींवर मात करत ग्रामसभेच्या माध्यमातून फळबाग व बांबू लागवड जिवंत ठेवण्याचा उल्लेखनीय आदर्श घालून दिला आहे. मस्टर निघणे बंद झाल्याने काम ठप्प झाले असतानाही ग्रामस्थांनी श्रमदानातून झाडांना पाणी देत 2800 कलमी रोपांचे संगोपन केले.

३० नोव्हेंबर २०२३ च्या शासन परिपत्रकानुसार सामूहिक वनहक्क दावा मिळालेल्या गावांना नरेगा (MGNREGA) अंतर्गत नोडल एजन्सीचा दर्जा देण्यात आला. त्याअन्वये किटाडी मेंढा ग्रामसभेने पंचायत समितीकडे २८०० कलमी रोपांच्या लागवडीसाठी प्रस्ताव सादर करून तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवली. जून २०२५ मध्ये आंबा, चिकू, सीताफळ, निंबू, चिंच यांसह विविध फळझाडांची लागवड करण्यात आली.



पावसाळा आणि हिवाळ्यात रोपे जोमाने वाढली; मात्र जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तहसीलदारांची बदली झाल्याने मस्टर प्रक्रिया थांबली. त्यानंतर २३ जानेवारीपासून तांत्रिक अधिकारी संपावर गेल्याने मस्टर पूर्णपणे बंद झाले. ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी झाडे कोमेजण्याची स्थिती निर्माण झाली.

या पार्श्वभूमीवर सामूहिक वनहक्क व्यवस्थापन समिती व रोजगार सेवक यांनी तातडीची ग्रामसभा घेऊन उपाययोजना आखली. प्रत्येक कुटुंबातील सदस्याने दररोज सकाळी दोन गुंड पाणी झाडांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील एक महिन्यापासून ग्रामस्थ श्रमदानातून सातत्याने पाणी देत आहेत.

ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे फळबाग पुन्हा तजेलदार झाली असून झाडे जोमाने वाढू लागली आहेत. किटाडी मेंढ्यानंतर कोरंबी आणि कसरला गावांनीही हा उपक्रम राबवून झाडे जिवंत ठेवली.

प्रशासनिक अडथळे असले तरी ग्रामसभा जंगल संवर्धन, संरक्षण आणि शाश्वत विकास प्रभावीपणे करू शकते, हे या गावांनी सिद्ध केले आहे. नागभीड तालुक्यातील हा उपक्रम राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे

Previous Post Next Post