Rajura Women Safety : जय भवानी कामगार संघटनेचे निवेदन, शहरात CCTV आणि कडक वाहतूक पोलिस बंदोबस्ताची मागणी
राजुरा : राजुरा शहरात वाढत्या महिला अत्याचार व छेडछाड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालय परिसरात CCTV कॅमेरे बसविण्याची तसेच प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस तैनात करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जय भवानी कामगार संघटना यांच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करण्यात आले. शहरातील महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून राजुरा शहर महिलांसाठी असुरक्षित होत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रत्येक महाविद्यालय, जिल्हा परिषद शाळा तसेच गर्दीच्या ठिकाणी तातडीने चित्रितीकरण यंत्रणा (CCTV) बसविण्यात यावी. अल्पवयीन मुली व महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. अलीकडे घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय, शहरातील प्रमुख चौकांमध्ये ट्रॅफिक पोलीस नियमितपणे दिसत नसल्याने वाहतूक कोंडी व सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस तैनात करावेत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष रोहित बत्ताशंकर यांनी निवेदन सादर केले. यावेळी अयान शेख, आर्याण दुबे, श्रावण साळवे, राज लढा, समीर शेख तसेच जयश्री लाडगे, अश्विनी शेंडे, शीतल चावरे, सपना सोनपीतरे आदी उपस्थित होते.
महिला सुरक्षेबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येईल, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
