Top News

नागभीडमध्ये टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई; नगरपरिषदेचा इशारा – दंड आणि नळ कापण्याची तयारी

 नागभीडमध्ये टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर कारवाई; नगरपरिषदेचा इशारा – दंड आणि नळ कापण्याची तयारी




नागभीड |  नागभीड शहरात पाणी चोरी करणाऱ्या नागरिकांवर आता कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे. नळ कनेक्शनला थेट ‘टिल्लू पंप’ लावून पाणी खेचणाऱ्यांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्यांवर दंड आणि नळ कापण्याची कारवाई केली जाणार आहे.

घोडाझरी पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू असतानाही काही नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. टिल्लू पंपाद्वारे पाणी खेचल्यामुळे पाण्याचा दाब कमी होऊन अनेक प्रामाणिक ग्राहकांना पाणी मिळत नसल्याची तक्रार वाढत आहे.

नगरपरिषदेकडून सांगण्यात आले की, पाणीपुरवठा सुरू असताना मोटार लावून पाणी खेचणे हे केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीर आहे. एका घराने लावलेला टिल्लू पंप संपूर्ण परिसराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम करतो. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आता प्रशासन प्रत्यक्ष कारवाईच्या भूमिकेत उतरले आहे.

तपासणी मोहिमेदरम्यान टिल्लू पंप वापरताना आढळलेल्या नागरिकांकडून मोठा दंड वसूल करण्यात येईल. तसेच संबंधित मोटार, पंप आणि साहित्य जप्त केले जाईल. वारंवार सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे नळ कनेक्शन कायमस्वरूपी बंद करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया देताना उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती प्रतीक भसीन यांनी सांगितले की, “काही भागात तांत्रिक कारणांमुळे पाणी पोहोचण्यास उशीर होत असला तरी इतरांचे पाणी चोरणे योग्य नाही. नागरिकांनी सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन टिल्लू पंपाचा वापर त्वरित बंद करावा, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”

नगरपरिषदेकडून घोडाझरी पाणीपुरवठा योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करून शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post Next Post