Top News

नागभीडमध्ये मका खरेदी केंद्रास मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा, ३० एप्रिलपर्यंत नोंदणीचे आवाहन

 नागभीडमध्ये मका खरेदी केंद्रास मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा, ३० एप्रिलपर्यंत नोंदणीचे आवाहन




नागभीड |  नागभीड तालुका खरेदी-विक्री सोसायटीला यावर्षीपासून मका खरेदी केंद्राची अधिकृत मंजुरी मिळाल्याने परिसरातील मका उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत प्रथमच हे केंद्र सुरू होत असून, शेतकऱ्यांनी येत्या ३० एप्रिल २०२६ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन संस्थेचे संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांनी केले आहे.

मागील वर्षी आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने सोसायटीची सत्ता काबीज केल्यानंतर नव्या संचालक मंडळाने शेतकरीहिताचे निर्णय घेत संस्थेच्या कामकाजाला गती दिली. अध्यक्ष संजु उरकुडे आणि उपाध्यक्ष रमेश पाटील बोरकर यांच्या नेतृत्वात यंदा आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणीत गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीडपट वाढ झाली आहे.

नागभीड, ब्रम्हपुरी आणि चिमुर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेतले जात आहे. मात्र, परिसरात मका खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात माल विकावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन संचालक संजय गजपुरे यांनी सोसायटीच्या बैठकीत मका खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबईकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला.

या प्रयत्नांना यश मिळत जिल्हा मार्केटिंग अधिकारी, चंद्रपूर यांनी रब्बी पणन हंगाम २०२५-२६ साठी नागभीड येथे मका खरेदी केंद्रास मंजुरी दिली आहे. या मंजुरीबद्दल आमदार बंटी भांगडिया यांचे संचालक मंडळ आणि शेतकऱ्यांनी आभार मानले आहेत.

नागभीड येथे सुरू होणारे हे केंद्र ब्रम्हपुरी आणि चिमुर तालुक्यांसाठीही मध्यवर्ती ठिकाण ठरणार असून, तीनही तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. कमी पाण्यात येणारे पीक असल्याने रब्बी हंगामात मक्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.

शासनाच्या सूचनेनुसार इच्छुक शेतकऱ्यांनी आधार कार्ड, ७/१२ उतारा, नमुना ८ आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत घेऊन नागभीड तालुका खरेदी-विक्री सोसायटी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष संजुभाऊ उरकुडे, उपाध्यक्ष रमेश पाटील बोरकर आणि संचालक मंडळाने केले आहे.

Previous Post Next Post