मनसे विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रिंगणात उतरणार - मनसे जिल्हाध्यक्ष रोडे
आदित्य भाके शर्यतीत
राजुरा : राजुरा नगर पालिकेची सार्वत्रिक निवडणूक वर्षाच्या अखेरीस म्हणजेच नोव्हेंबर–डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रियेला अवघे दोन महिने शिल्लक असतानाच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे यंदा नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नात नगराध्यक्ष पदाची खुर्ची झळकू लागली आहे.
दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून शहराच्या सर्वांगीण विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘विकास हा मुख्य मुद्दा’ ठेवून आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आहे. ही माहिती मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांनी दिली. त्यांच्या या घोषणेनंतर काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांची चांगलीच धांदल उडाली असल्याची माहिती सूत्रांकळून प्राप्त झाली आहे.
मनसे तालुका अध्यक्ष आदित्य भाके यांनीही निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली आहे. आदित्य भाके हे मागील १७ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि नंतर मनसेच्या माध्यमातून त्यांनी जनतेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध आंदोलनांद्वारे सामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देत त्यांनी मनसे स्टाईलने आपली छाप उमटवली आहे. त्यांच्या आई साधना भाके यांना त्यांनी स्वबळावर निवडून आणल्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
राजुरा नगरपालिकेच्या राजकारणाकडे पाहता, मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र या कार्यकाळात शहराच्या विकासाचे चित्र फारसे बदलले नसल्याची नागरिकांची नाराजी आहे. रस्ते, नाले, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसे जिल्हाध्यक्ष रोडे यांनी केला आहे.
काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष अरुण धोटे आणि माजी उपाध्यक्ष सुनील देशपांडे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” म्हणत देशपांडे यांनी मैदानात तयारी सुरू केली आहे. भाजपाने मात्र आपला उमेदवार अद्याप जाहीर केलेला नाही, तरी इच्छुकांची मोठी यादी पक्षात तयार झाली असल्याचे समजते. काही माजी आमदार समर्थकांनी सध्याचे आमदार भोंगळे यांच्या गोटात प्रवेश केला असल्याने पक्षातील समीकरणांमध्ये चांगलीच रंगत आली आहे.
शेतकरी संघटनेने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. ते कोणासोबत जाणार की स्वबळावर लढणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि शेतकरी संघटना या तिन्ही पक्षांना जवळपास समान मते मिळाल्याने तिघांचाही जनाधार मजबूत असल्याचे चित्र समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष रोडे यांनी निवडणुकीत उतरण्याची घोषणा केल्याने राजुरा नगरपालिकेच्या रणसंग्रामात नव्या समीकरणांची चुणूक दिसू लागली आहे. मनसेचे युवा नेते आदित्य भाके यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे इच्छुक उमेदवारांचा रक्तदाब वाढल्याचे बोलले जात आहे.
शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर मनसे मैदानात उतरल्याने यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे निश्चित दिसते.
