बापरे,नागभीड तालुक्यात बिबट्याची प्रसूती चक्क गावातील एका घरात, तीन बछड्यांना दिला जन्म..
चंद्रपूर / नागभीड : वाघ असो किंवा बिबट नेहमी जंगलातच बछड्यांना जन्म दिल्याचे ऐकले आणि पाहिले आहे. पण चक्क घरात एखाद्या मादी बिबटने बछड्यांना जन्मास घातल्याचे सांगितले तर विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. नागभीड तालुक्यातून अशीच एक घटना समोर येत आहे.तालुक्यातील बाळापूर गावात जंगलाशेजारी असलेल्या एका पडक्या घरात मादी बिबटने तिन बछड्यांना जन्म दिला आहे. सध्या तिन्ही बछडे तंदूरूस्त असून त्याच ठिकाणी वनविभागाच्या निगराणीत आहेत. नागभिड तालुक्यात तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत तळोधी मेंडकी मार्गावर बाळापूर दीड हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावाशेजारी जंगल लागून आहे. त्यातील काही घरे जंगलालाच लागून आहेत.
बिबट चक्क गावात आला आणि जंगलाला लागून असलेल्या एका घरात त्याची प्रसूती झाली. तिने तीन बछड्यांना जन्म दिला. नागभीड तालुक्यातील बाळापूर खुर्द येथे सोमवारी सकाळी ७:०० - ७:३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून बाळापूर येथे बिबट्याचा चांगलाच धुमाकूळ सुरू होता. या कालावधीत बिबट्याने गावात येऊन काही गावकऱ्यांच्या बकऱ्या, गायी आणि बैल ठार केले होते. बिबट्याच्या या कारवायांनी गावकरी चांगलेच दहशतीत आले होते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळीच ही बिबट एका घरातून बाहेर पडताना एका व्यक्तीस दिसली. ही माहिती लगेच गावकऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी घरात जाऊन चौकशी केली असता घराच्या एका कोपऱ्यात तीन बछडे दिसून आले. बिबट्याचे दर्शन झाल्याने लगेच ही माहिती वनरक्षक मैंद यांना देण्यात आली. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी येऊन काही नागरिकांना सोबत घेऊन त्या पडक्या घरात बघितले असता, त्या ठिकाणी मादी बिबटचे तिन बछडे आढळून आले. ज्या घरात बछडे आढळून आले ते घर पडके आहे. त्या ठिकाणी कुणीही वास्तव्यास नाही. शिवाय ते घर जंगलाला लागून आहे.
वनरक्षक मैंद यांनी, नागभिडचे वनपरिक्षेत्राधिकारी सुनील हजारे यांना माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनात तळोधी (बा.) राऊंड ऑफिसर नेरलवार व त्यांच्या चमुने घटनास्थळी भेट दिली. त्यांना घरात बिबटचे बछडे आढळून आले. घर आणि सभोवती परिस्थीतीची पाहणी केली. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, बछडे सात आठ दिवसांपूर्वी जन्मास आले आहेत. दिवसा मादी बिबट या ठिकाणी राहत नाही. रात्रीच्या वेळी मादी बिबटचे वास्तव्य असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मादी बिबटचे बछडे असल्यामुळे नागरिकांना धोका होऊ नये याकरीता त्या घराच्या सभोवती तिन्ही बाजूंनी जाळी लावण्यात आली आहे. जंगलाच्या दिशेचा रस्ता जण्या-येण्यासाठी मोकळा ठेवण्यात आला आहे. बिबट मादीच्या हालचालींवर निगराणी ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. तळोधी (बा.) वनपरिक्षेत्राचे अधिकारी,कर्मचारी त्या बिबट मादी व बछड्यांवर नजर ठेवनू आहेत. आता पर्यंत जंगलात सुरक्षित ठिकाणी बिबट जन्मास येण्याचे पाहिले होते, परंतु बाळापूर गावातील घटनेवरून घरात मादी बिबटने बछड्यास जन्मास घातल्याने सर्वत्र चर्चेला उधान आले आहे. अशी घटना पहिल्यांदाच बघायला व ऐकायला मिळाल्याने अनेकांना आश्यर्य वाटत आहे.
