नागभीड जिल्हा निर्मीती साठी असंख्य नागरीक उतरले रस्त्यावर.........
शहर कडकडीत होते बंद : तहसीलदारांना दिले निवेदन
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
'नागभीड' जिल्ह्याच्या मागणीसाठी सोमवारी नागभीडकर मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरले आणि नागभीड जिल्हा झालाच पाहिजे,अशी एकमुखी मागणी केली. जिल्ह्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या या मोर्चास तालुकावासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागभीड जिल्हा निर्माण कृती समितीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नागभीड जिल्हा मागणीसाठीच्या या मोर्चाची सुरुवात स्थानीक टीचर्स सोसायटीच्या कार्यालयापासून झाली. खिशाला जिल्हा मागणीचा बिल्ला आणि हातात फलक घेऊन तसेच जिल्हा मागणीच्या विविध घोषणा देत हा मोर्चा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आला. हा मोर्चा येथील तहसील कार्यालयावर धडकला.
यानंतर या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. या सभेस अनेकांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास मागणी करणाऱ्या इतर तालुक्यांपेक्षा नागभीड हा तालुका सर्वच दृष्टीने योग्य आहे. केवळ क्रांतिभूमी किंवा व्यापारनगरीचे निकष लावून जिल्ह्याची निर्मिती न करता इतर तालुक्यांना सर्वसमावेशक व सर्वांना मध्यवर्ती ठरणाऱ्या नागभीड येथेच जिल्हा निर्मिती करावी, अशी मागणी या सभेत केली. या मोर्चासोबतच जिल्हा मागणीच्या समर्थनार्थ शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले होता.
अपर जिल्हाधिकारी कार्यालयास विरोध.....
📌 चिमूर येथे शासनाने अपर जिल्हाधिकारी कार्यालय निर्मितीची घोषणा केली आहे. चिमूर हे ठिकाण एका टोकाला असून, गैरसोयीचे आहे. त्यामुळे नागभीडचा चिमूर अपर जिल्हाधिकारी यात समावेश करू नये, अशी मागणीही या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
📌 या मोर्चात काही शेतकरी आपल्या बैलबंडीसह सहभागी झाले होते. तर एक भजन दिंडीही सहभागी झाली.



