Longest Day of the Year 2023: Why is June 21 the longest day of the year?

Longest Day of the Year 2023: 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस का आहे?




विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर) 


आज उन्हाळी संक्रांती. खरंतर ही एक खगोलीय घटना आहे. आज पृथ्वीचा उत्तर ध्रुव (काही काळ) सूर्याच्या जास्तीत जास्त समोर येतो. परिणामी उत्तर गोलार्धात सूर्यप्रकाश जास्त काळ पडतो. आणि तिकडे हा दिवस वर्षभरातील सर्वात मोठा दिवस असतो. 13 तासांपेक्षाही  जास्त कालावधीचा दिवस तर, सर्वात छोटी रात्र अनुभवायला मिळते. आजचा सुर्योदय 6.01 ला तर, सूर्यास्त सायंकाळी 7.08 ला होईल. आज पासूनच सूर्याचे दक्षिणायन चालू होते. ही खगोलीय घटना प्रतिवर्षी 20-22 जून दरम्यान घडते म्हणून या दिवसाला जून संक्रांती June solstice असेही म्हणतात. या दिवशी सूर्य बरोब्बर कर्क वृत्तावर (tropic of cancer) तळपत असतो, त्यामुळे या दिवसाला आपण कर्क संक्रांती असेही म्हणू शकतो. 

 


     पृथ्वीचा स्वांगभ्रमण अक्ष तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी लंबरुप नाही. तो 23.5 अंशांनी कललेला आहे. याच अवस्थेत स्वतःभोवती फिरत पृथ्वी सूर्यला प्रदक्षिणा घालते. त्यामुळे तिचे दोन्ही ध्रुव (दक्षिण, उत्तर) वर्षातून एकेकदा सूर्याच्या समोर (जवळ) येत असतात. उत्तर ध्रुव (north pole) 20-22 जून रोजी, तर दक्षिण ध्रुव (south pole) 20-23 डिसेंबर रोजी सूर्याच्या जवळ येतो(winter /December solstice) . या दोन दिवसांना 'अयनदिन' solstice असे म्हणतात. पृथ्वीचा जो ध्रुव सूर्याच्या समोर येतो, त्या गोलार्धात तो दिवस वर्षभरातील सर्वात मोठा दिवस असतो. तिकडे ती रात्र वर्षातील सर्वात लहान रात्र असते. या वेळी विरुद्ध गोलार्धात मात्र बरोब्बर याच्या विपरीत स्थिती असते. 

          23.5 अंश केलेल्या अवस्थेत, तिरक्या गिरक्या घेत घेत पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरते. अशा विचित्र ख-भौगोलिक स्थितीमुळे, खरंतर प्रत्यक्षात  पृथ्वीचे दररोज  उष्णकटिबंधीय प्रदेशातील वेगवेगळे अंग सूर्याच्या समोर येत असते, आपल्याला मात्र  आकाशात सूर्य सहा महिने दक्षिण गोलार्धात, तर सहा महिने उत्तर गोलार्धात सरकताना भासतो. सूर्याच्या या भासमान स्थलांतरास  "दक्षिणायन -उत्तरायण" असे म्हणतात. 


        आज सूर्य आकाशात वैषुविक वृत्तापासून 23.5 अंश उत्तरेला (अवष्टंभ बिंदुवर ) असतो . त्यामुळे आज कर्कवृत्तावर सूर्यकिरण लंबरुप पडतात . आज पासून "दक्षिणायन" चालू होणार. म्हणून हा 'अयन दिन ' solstice . यापुढे सूर्याचे आकाशातील स्थान रोज हळू हळू दक्षिणेकडे सरकताना दिसणार. 20-22 डिसेंबरला तो दक्षिण गोलार्धात 23.5 अक्षांशावरील मकर वृत्तावर पोहोचेल (विष्टंभ बिंदुवर) . येथून पुढे सूर्याचे 'उत्तरायण' सुरु होते. म्हणून हा अयनदिन. या दिवशी पृथ्वीचा दक्षिण ध्रुव सूर्याच्या समोर (जवळ) असतो. दक्षिण गोलार्धात  हा दिवस वर्षभरातील सर्वात मोठा दिवस असतो आणि तिकडे उन्हाळा सुरू असतो. मात्र या काळात उत्तर गोलार्धात हिवाळा असलेने या घटनेला 'हिवाळी संक्रांती' (winter/december solstice)  म्हणतात. 

        उत्तरायण व दक्षिणायनावेळी, असे वर्षातुन दोन वेळा सूर्य विषुववृत्त ओलांडतो. तेंव्हा तो विषुववृत्तावर असतो. हे  दोन दिवस 'विषुवदिन ' म्हणून ओळखले जातात. 19-21मार्चला सूर्य विषुववृत्तावर असतो. तेथून तो उत्तर गोलार्धात प्रवेश करतो. या दिवशीच आपल्याकडे वसंत ऋतू सुरु होतो. म्हणून राशी चक्रावरील या बिंदुस 'वसंतसंपात' vernal equinox असेही म्हणतात. तसेच 21-23 सप्टेंबर रोजी सूर्य पुन्हा  विषुववृत्तावर येतो व तेथून पुढे दक्षिण गोलार्धात प्रवेश करतो. या दिवसा पासून आपल्याकडे शरदरुऋतूस प्रारंभ होतो. म्हणून या संपात बिंदुस 'शरद संपात ' autumnal equinox असे संबोधतात. विषुवदिनी दिवस व रात्र ही समान कालावधीचे (12-12 तासांचे) असतात. या दिवशी सूर्य आकाशातील वैषुविक वृत्तावर असलेने त्याचे किरण विषुववृत्तावर लंबरुप पडतात. तसेच ते दोन्ही ध्रुवांवर पोहोचत असलेने, या दिवशी संपूर्ण पृथ्वी सूर्यप्रकाशात न्हाऊन निघते. पृथ्वीतलावर सर्वत्र दिवस व रात्र समान कालावधीचे असतात. 

        पृथ्वीची कक्षा ,  कललेला अक्ष,  व ती स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरते आहे म्हणून आपण दिवस-रात्र, भिन्न ऋतू, जैवविविधता अनुभवतो. हेच आपल्या वसुंधरेचे वेगळेपण आहे. 

              - शंकर शेलार. 

          संचालक - 'काॅस्मिक आय' सांगली.