Top News

महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भातील जनतेचा चुराडा - जय विदर्भ पार्टी.

महाराष्ट्राच्या राजकारणात विदर्भातील जनतेचा चुराडा - जय विदर्भ पार्टी.




विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर


       मोठ्या आशेने जनतेने महाराष्ट्र सरकारला निवडून दिले, म्हणात होत की सर्व प्रश्न, अडचणी सुटणार पण नेहमी नेहमी राजकीय तेढ निर्माण होत असल्याने विदर्भातील जनतेच्या इच्छा - आकांक्षाना निराशा आलेली आहे. पक्ष विपक्ष दोघांनी जनतेला वाऱ्यावर सोडलेले आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्या ऐवजी आपल्या स्वतःच्या स्वार्थापोटी एकमेकांचे लचके तोडत आहेत. सुरत,गुवाहाटी येथे महागड्या हॉटेल मध्ये लपून बसलेले आहेत. हे दृश्य पाहून राज्याची जनता खजिल झालेली आहे. तर विदर्भाची जनता त्यांच्यासोबत घातपात झाल्यामुळे दुःखी व आक्रोशीत आहे. सध्या राज्यात मान्सून सुरु झाला असून पेरणीचा सीजन चालू होत आहे. शेतकऱ्यांन जवळ पैसा नाही. सत्ताधाऱ्यांनी अजून कर्ज उपलब्ध करुन दिले नाही, खताचा पुरवठा उपलब्ध नाही, नकली बियाण्यांन शेतकरी ठगला जात आहे, राज्याचे व देशाचे राजकारणी कटाशहाच्या खेळात रमलेले आहेत. अश्यात जनता  हवालदिल झाली असून, दोन रेड्यांच्या टक्करीत जनतेचा चुराडा मुंग्यासारखा होत आहे. ही  स्थिती पाहून चाणाक्ष व्यापारी, विक्रेते यांनी बी बियाणांचे व खताचे भाव रातोरात अनेक पटीने वाढविले,  "राजनैतिक पार्ट्या पळवापळवीच्या खेळात धुंद आहे, प्रशासन गुंग आहे ". अश्यावेळी जनतेचा वाली कोण? त्यांना कोण दिलासा देणार हा सवाल "जय विदर्भ पार्टी"ने उपस्थित केला आहे.

       कोरोनाच्या सावटीतून बाहेर निघण्याच्या मार्गांवर असलेला विदर्भाचा युवक आज त्याच्या हाताला काम नसल्यामुळे पूर्णपणे निराशेत गेलेला आहे, त्यामुळे 476 पदवीधर, उच्चशिक्षित, एम.बी ए, इंजिनिअर झालेल्या  युवकांनी आतापर्यंत मागील दीड  वर्षात आत्महत्या केली आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, याची जवाबदारी कोणावर,  अशा परिस्थितीत मरणागत जनतेला सरणावर सोडून पळालेल्या राजनीतीज्ञापासून आतातरी जनतेने सावध व्हावे, येत्या निवडणुकीत त्यांना कायमचा धडा शिकवावा असे "जय विदर्भ पार्टी" ने जनतेला आवाहन केले आहे. मा.राज्यपाल, प्रशासन प्रमुख यांनी तात्काळ दखल घेऊन राज्याच्या प्रशासनाला क्रियाशील करावे व बोगस बियाणे, वाढलेले बियाणांचे भाव, वाढवलेले खतांचे भाव, मंजूर न झालेले शेतकऱ्यांचे कर्ज, याबाबत तात्काळ कार्यवाही करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच जनतेच्या समस्याची दखल घेऊन त्या तात्काळीने सोडवाव्या अशी मागणी जय विदर्भ पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष श्री.अरुणभाऊ केदार, उपाध्यक्षा श्रीमती.रंजना मामर्डे, उपाध्यक्ष मुकेश मासुरकर , महासचिव विष्णूजी आष्टीकर, कोषाध्यक्ष सुयोग निलदावार,  सहसचिव गुलाबराव धांडे, कार्यकारणी सदस्य अरुण मुनघाटे, कृष्णाजी भोंगाडे, सुदाम राठोड, मारोतराव बोथले, पॉलिट ब्युरो सदस्य तात्यासाहेब मते, सुधाताई पावडे, मध्य नागपूर अध्यक्ष नरेश निमजे, दक्षिण नागपूर अध्यक्ष राजेंद्र सतई, दक्षिण -पश्चिम नागपूर अध्यक्ष अशोक पाटील, उत्तर नागपूर अध्यक्षा ज्योती खांडेकर यांनी केली.   

जगतगुरु तुकाराम महाराज यांच्यानुसार "बुडती हे जण न देखवे डोळा, म्हणूनी कळवळा येत असे", जनतेला वाऱ्यावर सोडून पद व पैशासाठी हपापलेल्या पक्ष विपक्षातील नेत्यांना पाहून जनता हैराण आहे.

Previous Post Next Post