Top News

Har Ghar Tiranga 2026: 'हर घर तिरंगा' अभियानात Chandrapur पुन्हा राज्यात No.1 ठरवूया – आ. सुधीर मुनगंटीवार

९ ते १७ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन; एक लाख तिरंगा ध्वज उपलब्ध करून वितरणासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र


चंद्रपूर | 'Har Ghar Tiranga 2026' अभियानात चंद्रपूर जिल्ह्याने यंदाही राज्यात अव्वल स्थान मिळवावे, या उद्देशाने राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर पत्र पाठवून व्यापक नियोजन करण्याची मागणी केली आहे. ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज अभिमानाने फडकावा यासाठी एक लाख तिरंगा ध्वज उपलब्ध करून त्यांचे नियोजनबद्ध वितरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.


पत्रात मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'हर घर तिरंगा' अभियानाला देशभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चंद्रपूर जिल्हा गेल्या काही वर्षांपासून या अभियानात राज्यात अग्रस्थानी राहिला आहे. यंदाही हा मान कायम राखण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच प्रभावी नियोजन करावे, असे त्यांनी म्हटले आहे.


नागरिकांना राष्ट्रध्वज सहज उपलब्ध व्हावा यासाठी एक लाख तिरंगा ध्वज प्रत्येकी २५ रुपयांच्या दराने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात यावी, तसेच ९ ते १७ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहोचेल यासाठी जनजागृती आणि वितरण मोहीम प्रभावीपणे राबवावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.


चंद्रपूर जिल्ह्याने राष्ट्रभक्ती, जनसहभाग आणि संघटित प्रयत्नांच्या बळावर यंदाही 'Har Ghar Tiranga Campaign 2026' मध्ये राज्यात अव्वल स्थान कायम ठेवावे, असा विश्वास व्यक्त करत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व नागरिकांना ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रप्रेमाचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.




Previous Post Next Post