नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या प्रमुख मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज क्रांती दिनाच्या पर्वावर रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी नागपुरात ‘विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंगमार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता दीक्षाभूमी येथून लॉंगमार्चला सुरुवात होणार असून संविधान चौक येथे त्याची सांगता होईल.
लॉंगमार्चनंतर संविधान चौक येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जनमत संघटित करण्याच्या उद्देशाने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या ११ ही जिल्ह्यांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक, विद्यार्थी तसेच विदर्भप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
या आंदोलनासाठी ॲड. वामनराव चटप, अध्यक्ष, विदर्भ राज्य आंदोलन समिती तथा माजी आमदार; प्रकाश पोहरे, प्रबंध संपादक, दैनिक देशोन्नती; प्रा. मंजुषा तिरपुडे, प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी; डॉ. श्रीनिवास खांदेवाले, मार्गदर्शक तथा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ; मुकेश मासुरकर, प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी; अरुण केदार, अध्यक्ष, पूर्व विदर्भ; प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, अध्यक्ष, पश्चिम विदर्भ; सुनील चोखारे, उपाध्यक्ष, पूर्व विदर्भ; ॲड. सुरेशराव वानखेडे, उपाध्यक्ष, पश्चिम विदर्भ आणि तात्यासाहेब मत्ते, विदर्भ प्रचार प्रमुख यांनी आवाहन केले आहे.
दीक्षाभूमी ते संविधान चौक या मार्गावर होणाऱ्या या लॉंगमार्चमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
