मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन; दुष्काळसदृश परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी तातडीच्या निर्णयाची अपेक्षा
चंद्रपूर | चंद्रपूर जिल्ह्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरीप हंगाम संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व कृषी पंपांना २४ तास अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात मुनगंटीवार यांनी नमूद केले आहे की, चंद्रपूर हा कृषिप्रधान जिल्हा असून धान, सोयाबीन, कापूस, तूर आणि इतर खरीप पिकांवर लाखो शेतकऱ्यांची उपजीविका अवलंबून आहे. यंदा मान्सून वेळेत दाखल झाला असला तरी अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी होऊन पिके करपू लागली असून उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या सिंचनासाठी कृषी विद्युत पंप हाच शेतकऱ्यांसमोरील प्रमुख पर्याय आहे. मात्र, महावितरणकडून केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्याने संपूर्ण शेतीला वेळेत पाणी देणे शक्य होत नाही. धानासह सोयाबीन आणि कापूस ही पिके वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत असून वेळेवर सिंचन न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च केला असल्याने त्यांच्या पिकांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचे नमूद करत मुनगंटीवार यांनी खरीप हंगाम संपेपर्यंत विशेष बाब म्हणून २४ तास अखंड कृषी वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय महावितरणला अतिरिक्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने निर्देश देण्यात यावेत, कमी दाबाचा किंवा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा टाळावा, ऊर्जा विभाग, महावितरण आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करून वीजपुरवठ्यावर सातत्याने देखरेख ठेवावी, तसेच चंद्रपूर जिल्ह्याला 'विशेष कृषी वीजपुरवठा जिल्हा' म्हणून घोषित करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
वेळेवर सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यास हजारो हेक्टरवरील पिके वाचतील, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळेल. शेतकरी सक्षम राहिला तरच कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत राहील, असे नमूद करत शेतकरीहिताचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यासाठी २४ तास अखंड कृषी वीजपुरवठ्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
