Top News

संघर्ष योद्धा पुरस्कारासाठी सुदाम राठोड यांची निवड; ९ ऑगस्ट रोजी नागपुरात होणार गौरव

 




जिवती | चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते सुदाम राठोड यांची प्रतिष्ठेच्या **"संघर्ष योद्धा पुरस्कार"**साठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार जनप्रकाश लोकसंस्था यांच्या वतीने ९ ऑगस्ट, क्रांती दिनानिमित्त नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.

जिवती तालुक्यातील नागरिकांच्या पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांबाबत सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम सुदाम राठोड यांनी केले आहे. जनहिताच्या प्रश्नांवर त्यांनी केलेल्या अविरत संघर्षाची दखल घेत जनप्रकाश लोकसंस्थेने त्यांची यंदाच्या "संघर्ष योद्धा पुरस्कारासाठी" निवड केली आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी सुदाम राठोड यांना मिळणारा हा तिसरा सन्मान असून, त्यांच्या सामाजिक कार्याची व्याप्ती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी याची ही पावती मानली जात आहे. गरीब, वंचित आणि आदिवासी समाजाला न्याय मिळावा तसेच त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचाव्यात यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

"जनसेवा हीच ईश्वरसेवा" या भावनेतून कार्य करणारे सुदाम राठोड यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळणारा हा पुरस्कार त्यांच्या सामाजिक योगदानाची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous Post Next Post