श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये विशेष मार्गदर्शन सत्र; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नागभीड : समिधा सेवा संस्था संचालित श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीड येथे विद्यार्थ्यांमध्ये इतिहास, संस्कृती, संशोधन आणि सागरी वारशाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘सागरी पुरातत्त्व (Ocean Archaeology) व प्राचीन लिपी (Ancient Scripts)’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी व्हीएनआयटी (VNIT) येथील पीएच.डी. संशोधक, सागरी पुरातत्त्व तज्ज्ञ आणि ४१ प्राचीन लिपींचे अभ्यासक आशीष प्रकाश जैन प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना समुद्रात दडलेल्या प्राचीन संस्कृती, भारताचा सागरी इतिहास, पुरातत्त्व संशोधनाची कार्यपद्धती तसेच विविध प्राचीन लिपींचे महत्त्व याविषयी सखोल व रंजक माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या शुभांगी पोहेकर होत्या. मुख्याध्यापिका संगीता नारनवरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शैलेश भुरसे यांनी केले.
समिधा सेवा संस्थेचे सचिव अजय रमेशचंद्रजी काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यासाठी आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे मार्गदर्शन सत्र अत्यंत माहितीपूर्ण, प्रेरणादायी आणि यशस्वी ठरले असे मत संस्थेचे अध्यक्ष गणेश जैरामजी तर्वेकर यांनी वेक्त केले.





