Top News

न्यू नागझिरा अभयारण्यात दुर्दैवी घटना! उमरझरी गेटवर कर्तव्य बजावत असताना अस्वलाच्या हल्ल्यात वनपालाचा मृत्यू....शामू शरणागत यांचा घटनास्थळीच मृत्यू; वनविभागात शोककळा, परिसरात भीतीचे वातावरण




  न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील उमरझरी गेट येथे कर्तव्य बजावत असताना वनपालावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारच्या सुमारास घडली. शामू शरणागत असे मृत वनपालाचे नाव असून, या घटनेमुळे वनविभागात शोककळा पसरली आहे. तसेच परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वनपाल शामू शरणागत हे उमरझरी गेट परिसरात नेहमीप्रमाणे आपले नियमित कर्तव्य बजावत होते. याचवेळी जंगलातून अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. जखमा अत्यंत गंभीर असल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेनंतर वनपाल शामू शरणागत यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शासन व वनविभागाकडून नियमानुसार तातडीची आर्थिक मदत आणि आवश्यक सर्व सहकार्य देण्यात यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, उमरझरी गेट परिसरासह लगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जंगलालगत राहणाऱ्या नागरिकांनी वनविभागाने वन्यप्राण्यांच्या हालचालींवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवावे, तसेच मानवी वस्त्यांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी केली आहे. वनकर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न या घटनेमुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे.



Previous Post Next Post