Top News

भद्रावती लघु पशु वैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव; कर्मचारी व साहित्य पुरविण्याची मागणी

 भद्रावती लघु पशु वैद्यकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव; कर्मचारी व साहित्य पुरविण्याची मागणी



भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : तालुक्यातील पाळीव जनावरांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या उद्देशाने उभारण्यात आलेल्या भद्रावती येथील लघु पशु वैद्यकीय रुग्णालयाची अवस्था चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयात आवश्यक साहित्य, कर्मचारी व मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याने पशुपालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन व दुग्ध विभागामार्फत भद्रावती शहराबाहेरील परिसरात सुमारे ४०५.३७ लाख रुपये खर्चून अद्ययावत इमारत उभारण्यात आली होती. मार्च २०२४ मध्ये या रुग्णालयाचे लोकार्पण करण्यात आले. मात्र काही महिन्यांतच रुग्णालयातील अनेक त्रुटी समोर आल्याने ही इमारत केवळ शोभेची ठरत असल्याची टीका होत आहे.

रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे वाढलेली असून अनेक कक्षांमध्ये आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याचे दिसून येते. शस्त्रक्रिया विभाग असला तरी आवश्यक उपकरणांचा अभाव आहे. ॲम्ब्युलन्सची सुविधा उपलब्ध असूनही नियमित चालक नसल्याने तिचा उपयोग होत नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच ऑक्सिजन पुरवठा व्यवस्था देखील अपुरी असल्याची बाब समोर आली आहे. 

तालुका स्तरीय रुग्णालय असूनही तज्ञ पशु चिकित्सक, सहाय्यक कर्मचारी तसेच शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपचार व्यवस्थेवर परिणाम होत आहे. अपुऱ्या सुविधांमुळे उपचारासाठी येणाऱ्या पाळीव जनावरांवर तात्पुरते उपचार करावे लागत असून काही जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्याचे सांगण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक अनिल पडोळे यांनी १२ मे रोजी सहाय्यक आयुक्त लघु पशु चिकित्सालय मेश्राम यांच्या मार्फत जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन सादर केले. रुग्णालयाच्या अद्ययावत इमारतीला साजेशा सुविधा उपलब्ध करून आवश्यक वैद्यकीय साहित्य, उपकरणे व पुरेसे कर्मचारी तातडीने नियुक्त करावेत, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.

Previous Post Next Post