Top News

१ मे रोजी विदर्भवाद्यांचा काळा दिवस : नागपूर बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

१ मे रोजी विदर्भवाद्यांचा काळा दिवस : नागपूर बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा



नागपूर : विदर्भ राज्याच्या प्रश्नावर पुढील दिशा ठरवण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीची राज्यस्तरीय कोअर कमेटी बैठक शनिवारी नागपूर येथे पार पडली. बैठकीत विदर्भ राज्याच्या मागणीला अधिक धार देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

बैठकीच्या प्रारंभी बुलढाणा येथील कोअर कमेटी सदस्य स्व. राधेश्याम भराडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून बैठकीस सुरुवात झाली.

या बैठकीत १ मे महाराष्ट्र दिनाच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये तालुका स्तरावर आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनाद्वारे विदर्भ राज्याच्या मागणीला अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

तसेच, १८ एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय नवराज्य निर्माण महासंघाच्या राष्ट्रीय संमेलनात सहभाग नोंदवण्याबाबतही चर्चा करण्यात आली. विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांत संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी नियोजन करण्यात आले असून, आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी पुढील दिशा निश्चित करण्यात आली.

या बैठकीस विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप, दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष रंजना मामर्डे, मार्गदर्शक डॉ. श्रीनिवास खांदेवाले, युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष मुकेश मासुरकर, पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, सुनील चोखारे, ॲड. सुरेश वानखेडे, डॉ. रमेश गजभे, माजी राज्य मंत्री राजेंद्रसिंह ठाकूर (गडचिरोली), नरेश निमजे, कपिल इद्दे, संजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विदर्भाच्या हक्कासाठी एकजूट आवश्यक असल्याचा सूर बैठकीतून उमटला.

Previous Post Next Post