Traffic Mismanagement Issue: : ट्रॅफिक पोलीस अनुपस्थित? नागरिकांत संताप; जय भवानी कामगार संघटना रस्त्यावर उतरण्याचा इशारा
राजुरा : तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे शहरातील तसेच बाहेरून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, अपुरी सिग्नल व्यवस्था आणि अपूर्ण रस्ते रचना यामुळे अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक नियंत्रणासाठी ट्रॅफिक पोलिसांची उपस्थिती कमी असल्याचा आरोप पुढे येत आहे.
पंचायत समिती चौक, नाका क्रमांक ३, बसस्टॉप परिसर आणि कापणगाव टी-पॉईंट यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी नियमितपणे ट्रॅफिक पोलीस कर्मचारी दिसत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. काहींनी कार्यालयीन उपस्थितीबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत.
वाहतूक शिस्त राखणे, वेगमर्यादा अंमलात आणणे आणि अपघात टाळणे ही सार्वजनिक सुरक्षेशी निगडित मूलभूत जबाबदारी असल्याचे नागरिकांचे मत आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना अतिरिक्त दक्षता आणि नियंत्रण आवश्यक असते. मात्र प्रत्यक्षात प्रभावी नियंत्रण यंत्रणा दिसून येत नसल्यास प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, जय भवानी कामगार संघटना चे शहर अध्यक्ष रोहित बत्ताशंकर यांनी इशारा देत सांगितले की, “ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर नसतील तर संघटना नागरिकांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उतरेल.” या वक्तव्यानंतर शहरात चर्चांना उधाण आले आहे.
अपघातानंतरची कारवाई करण्यापेक्षा अपघात रोखणे अधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील वाढती वाहतूक, सुरू असलेले महामार्ग काम आणि अपुरी नियंत्रण यंत्रणा या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस पावले उचलावीत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
