Celebrates 75 Glorious Years with Grand Rally : जनता शिक्षण संस्था नागभीड अमृतमहोत्सव: ७५ वर्षांच्या शैक्षणिक परंपरेचा दिमाखदार शुभारंभ, विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीने शहर दुमदुमले
नागभीड : ग्रामीण भागातील शिक्षणाची ज्योत ७५ वर्षांपूर्वी प्रज्वलित करणाऱ्या जनता शिक्षण संस्था, नागभीड यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. शिक्षण, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची समृद्ध परंपरा जपणाऱ्या संस्थेच्या ७५ वर्षांच्या प्रेरणादायी प्रवासाचा यावेळी गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांची भव्य रॅली; सांस्कृतिक देखाव्यांनी वेधले लक्ष
कार्यक्रमाची सुरुवात शहरातून काढण्यात आलेल्या भव्य विद्यार्थ्यांच्या रॅलीने झाली. पंढरीची वारी देखावा, वृक्षदिंडी आणि ग्रंथदिंडी यांचा समावेश असलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी लेझीम, पारंपरिक वेशभूषा, घोषवाक्ये आणि फुलांची उधळण करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अमृतमहोत्सवी जल्लोषाने संपूर्ण नागभीड शहर भारावून गेले.
मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन
उद्घाटन समारंभात भारत माता, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागत गीत व स्वागत नृत्याने कार्यक्रमाची रंगत वाढवली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. रविंद्र कावळे यांनी केले.
किर्तीकुमार भांगडिया यांचे मार्गदर्शन
उद्घाटक आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सत्याचा मार्ग स्वीकारण्याचे आणि योग्य वेळी निर्भीडपणे मत व्यक्त करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या संचालक मंडळाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
डॉ. एस. एन. पठाण यांचे विचार
माजी प्राचार्य व सामाजिक विचारवंत डॉ. एस. एन. पठाण यांनी शिक्षण संस्थांची समाजघडणीतली भूमिका अधोरेखित केली. प्रतिकूल परिस्थितीतही जनता शिक्षण संस्थेने नागभीडसह परिसरातील खेड्यांना शिक्षणाच्या प्रवाहाशी जोडले, असे त्यांनी सांगितले. गुणवंत होण्यापेक्षा ज्ञानवंत होण्यावर विद्यार्थ्यांनी भर द्यावा, असा संदेश त्यांनी दिला.
बदलत्या काळानुसार शिक्षणाची गरज
मुख्याधिकारी सोनम देशमुख यांनी काळानुसार शिक्षण संस्थांनी बदल स्वीकारणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. स्पर्धात्मक युगात सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. गट विकास अधिकारी स्नेहल लाड यांनी स्वातंत्र्योत्तर काळात स्थापन झालेल्या या संस्थेने शेतकरी व मजूर वर्गाच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली केल्याचे गौरवोद्गार काढले.
वाचन संस्कृतीवर भर
सेंट क्लारेट स्कूल, चिमूरचे प्राचार्य फादर रॉबिन पॉल यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले. पुस्तकातून मिळणारे ज्ञान आयुष्यभर साथ देते, असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषण: ७५ वर्षांची अखंड तपश्चर्या
अध्यक्ष प्रा. डॉ. अमीर धमानी यांनी संस्थेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व विभूतींचे आभार मानले. “७५ वर्षांची शैक्षणिक परंपरा ही समाजघडणीची अखंड तपश्चर्या आहे,” असे सांगत अमृतमहोत्सवी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.
मान्यवरांचा सत्कार व उपस्थिती
या प्रसंगी किर्तीकुमार (बंटी) भांगडिया, डॉ. एस. एन. पठाण, स्नेहल लाड, सोनम देशमुख, फादर रॉबिन पॉल यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मंचावर संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक, विद्यार्थी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सतीश मेश्राम व प्रा. रुपाली पाथोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. मायकेल बोरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तिन्ही विद्यालयांच्या प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
