Top News

Police Bharti Sensor Issue: पोलीस भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सेन्सरची तपासणी करा

 Police Bharti Sensor Issue:  पोलीस भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सेन्सरची तपासणी करा


चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार  सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथे सुरू असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत १०० मीटर धावण्याच्या परीक्षेदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सेन्सरमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या तक्रारींची लगेच दाखल घेत पोलिस अधीक्षक यांना पत्र लिहून लक्ष वेधले. या धावण्याच्या परीक्षेत वापरलेल्या सेन्सरमध्ये तांत्रिक अडचणी असल्याने अनेक सक्षम व सुदृढ उमेदवारांना १५ पैकी केवळ ४, ६ किंवा ८ असे अत्यल्प गुण मिळत असल्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी निदर्शनास आणून दिले. पोलिस अधीक्षकांनी याची तात्काळ तपासणी करावी अशा सूचना आ. मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.

याशिवाय धावण्याच्या प्रारंभबिंदूवर सेन्सर बसविण्यात आलेला नसल्याचीही माहिती उमेदवारांकडून मिळत आहे. त्यामुळे वेळ मोजण्यात अचूक मोजमाप होत नसून उमेदवारांमध्ये संभ्रम व नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. इतर जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांना १५ पैकी १३ ते १५ गुण मिळत असल्याचे दिसून येत असताना, चंद्रपूरमध्ये तुलनेने अत्यल्प गुण मिळत असल्याने स्थानिक उमेदवारांमध्ये असंतोष वाढत असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर सदर प्रकरणाची तातडीने निष्पक्ष तपासणी करून धावण्याच्या परीक्षेत वापरला जाणारा सेन्सर तपासावा, आवश्यक असल्यास बदलावा, तसेच प्रारंभबिंदूवरही सेन्सर बसवून धावण्याचे अचूक मोजमाप सुनिश्चित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित हा अत्यंत संवेदनशील विषय असून कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, याची प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी, असेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रामध्ये अधोरेखित केले आहे.

उमेदवारांनी मानले आभार

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश जोशी, लक्ष्मण शेंडे यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर केले. यावेळी उमेदवारांच्या शिष्टमंडळासोबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवर संवाद साधत कोणत्याही उमेदवारावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. पोलिस अधीक्षक मूमक्का सुदर्शन हे नागभीड दौऱ्यावर असल्याने एसडीपीओ चौगुले यांनी निवेदन स्वीकारले. तसेच पोलिस अधीक्षकांनीही उमेदवारांच्या प्रतिनिधींशी दूरध्वनीवर चर्चा करून पूर्ण खबरदारी घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी उमेदवारांनी हे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेतल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे आभार मानले

Previous Post Next Post