Top News

Shiv Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराजांचे अभियांत्रिकी दृष्टिकोन आजही प्रेरणादायी – प्रा. पराग धनकर

 Shiv Jayanti 2026 : छत्रपती शिवाजी महाराजांचे अभियांत्रिकी दृष्टिकोन आजही प्रेरणादायी – प्रा. पराग धनकर



चंद्रपूर | छत्रपती शिवाजी महाराज यांनी दूरदृष्टीपूर्ण राज्यकारभारासोबत अभियांत्रिकी क्षेत्रातही आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक पराग धनकर यांनी केले. गडकिल्ल्यांची भक्कम बांधणी, प्रगत सिंचन व्यवस्था, सक्षम आरमार आणि पर्यावरणपूरक नियोजन ही त्यांच्या उत्कृष्ट अभियांत्रिकी कौशल्याची ठळक उदाहरणे असल्याचे त्यांनी सांगितले.

सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट, चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी इंजिनियरिंग महाविद्यालय, चंद्रपूर येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रा. धनकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अनिल चिताडे होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.

प्रा. धनकर म्हणाले की, शिवकालीन गडकिल्ल्यांची रचना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून करण्यात आली होती. डोंगरमाथ्यांवरील किल्ल्यांची रणनीतिक बांधणी, पाण्याची साठवण व्यवस्था आणि संरक्षणात्मक बुरुज यामध्ये सूक्ष्म नियोजन दिसून येते. शेतीस पूरक ठरेल अशी सिंचन व्यवस्था उभारून शाश्वत विकासाचा आदर्श त्यांनी घालून दिला.

आरमार उभारून समुद्री सुरक्षेला बळकटी देताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला. किनारपट्टीवरील किल्ले आणि नौदलाची रणनीती ही त्या काळातील प्रगत अभियांत्रिकी व लष्करी दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने किल्ल्यांभोवतीची नैसर्गिक रचना जपण्यावर त्यांनी विशेष भर दिला, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या शौर्य, पराक्रम, न्यायप्रियता आणि रयतेप्रती असलेल्या कर्तव्यभावनेवर प्रकाश टाकण्यात आला.

महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. डॉ. धनंजय डुंबेरे यांनी केले.


Previous Post Next Post