Top News

Pollution Alert at Varad Vinayak : वरद विनायक येथे अपघातांचा धोका वाढला – प्रदूषणाने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली

Pollution Alert at Varad Vinayak :  वरद विनायक येथे अपघातांचा धोका वाढला – प्रदूषणाने परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांची चिंता वाढली




 भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार   : विदर्भात सर्वदूर ख्याती प्राप्त आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाणारे वरद विनायक मंदिर परिसर सध्या वाढत्या अवजड वाहतुकीमुळे अपघातप्रवण Accident-Prone zone ठरत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

उंच टेकडीवरील मंदिर, पायथ्याशी प्राचीन तलाव, सभोवतालचा निसर्गरम्य परिसर, तसेच खाली असलेले सूर्यमुखी हनुमान मंदिर आणि पर्यटक निवास यामुळे येथे भाविक व पर्यटकांची सतत वर्दळ असते. मात्र रेल्वे विस्तारीकरणाच्या कामामुळे मुख्य मार्गावरून दिवस-रात्र हायवा व ट्रकची अवजड वाहतूक सुरू असून धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

मंदिरालगत असलेल्या Fairy Land School मधील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, फ्लोरा सिटी परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनाही प्रदूषणाचा मोठा फटका बसत आहे. वाढत्या धुळीमुळे श्वसनाचे आजार, डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

भर शहरातून अवजड वाहतूक होत असतानाही नियमानुसार प्रतिबंध न घालण्यात आल्याने बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते रेल्वे गेट क्रमांक ३५ हा मुख्य मार्ग जर्जर बनला असून अपघातांना आमंत्रण देणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासन व पोलिस विभागाने या जीवघेण्या वाहतुकीवर तातडीने अंकुश ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे.

कारवाईची मागणी

प्रभाग क्रमांक १४ मधील नागरिक, विद्यार्थी व भक्तांनी कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीच्या माध्यमातून अवजड वाहतुकीवर निर्बंध आणून परिसराचे सौंदर्य व सुरक्षितता अबाधित राखण्याची मागणी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, नगर परिषद अध्यक्ष प्रफुल चटकी व संबंधित नगरसेवकांनी याकडे तातडीने लक्ष देऊन तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


“माझ्या प्रभागातील या समस्येची मला पूर्ण जाणीव असून, जबाबदार नगरसेवक म्हणून मी स्वतः सभागृहात प्रश्न उपस्थित करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परिसराचे सौंदर्य व सुरक्षितता राखण्यासाठी मी बांधिल आहे.”

— राजेश शामराव बदखल, तज्ञ स्वीकृत नगरसेवक

Previous Post Next Post