विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीमुळे खचून न जाता स्थितप्रज्ञ राहून जीवनात यशाचे शिखर गाठले पाहिजे. - डॉ. सुधीर कोहचाडे
नवतरंग – २०२५-२६ या वार्षिकोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मत
नागभीड – राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय येथे ‘नवतरंग–2025-26’ या वार्षिक क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोज वनमाळी होते.उद्घाटक म्हणून डॉ. सुधीर कोहचाडे (आर.एल.टी. महाविद्यालय, अकोला) उपस्थित होते. मार्गदर्शक म्हणून दिपक बेहरे यांची उपस्थिती लाभली. प्रमुख अतिथी म्हणून उमाकांत वनमाळी, धनंजय वनमाळी, अक्षय वनमाळी, श्रीकांत वनमाळी यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख आणि संयोजक डॉ. विकास मोहतुरे मंचावर उपस्थित होते.
“स्थितप्रज्ञ राहून यशाचे शिखर गाठा” – डॉ. सुधीर कोहचाडे
उद्घाटनपर भाषणात डॉ. सुधीर कोहचाडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या संघर्षाचे अनुभव कथन करत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. सुरुवातीच्या कठीण काळातील अनुभव भविष्यात आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात काम करताना तसेच हिमालय पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहण करताना कसे उपयोगी पडले, याचे उदाहरण त्यांनी दिले.“विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीमुळे खचून न जाता स्थितप्रज्ञ राहून जीवनात यशाचे शिखर गाठले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.दिपक बेहरे यांनी वार्षिकोत्सव विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरतो, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात मनोज वनमाळी यांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संस्था कटिबद्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी उपलब्ध व्यासपीठाचा उपयोग करून आपल्या उपजत कलागुणांना वाव द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
विविध क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश
‘नवतरंग–2025-26’ अंतर्गत कबड्डी, व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेनिस, रस्साखेच, गोळाफेक, भालाफेक, बुद्धिबळ आणि धावणे अशा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच आनंदमेळावा, पुष्पगुच्छ रचना, डिश डेकोरेशन, रांगोळी, एकलनृत्य, सामूहिक नृत्य, एकपात्री नाट्य, नाटिका आणि फॅशन शो अशा सांस्कृतिक स्पर्धांचाही समावेश आहे.प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक विकासासाठी समर्पितपणे कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अंकुश कायरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विकास मोहतुरे यांनी केले.उद्घाटन सोहळ्यास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
