Top News

Historic Decision : हिरासिंग रामलाल राठोड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; संत सेवालाल महाराज नावाने वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतर

Historic Decision : हिरासिंग रामलाल राठोड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश; संत सेवालाल महाराज नावाने वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतर




 वाशिम :  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम असे नाव अधिकृतपणे प्रदान करण्यात आले आहे. राज्य शासनाने यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) जारी करून नामांतरास मान्यता दिल्याने जिल्ह्यासह संपूर्ण विभागात समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.या नामांतरासाठी अमरावती विभागाचे शिक्षक आमदार किरणराव सरनाईक यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून मागणी उपस्थित केली होती. त्यानंतर त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत शासनाचे लक्ष वेधले. विधान परिषद सदस्य बाबुसिंग महाराज  व मोहिनी इंद्रनील नाईक नगराध्यक्ष, पुसद यांनीही या मागणीस बळ देत शासन स्तरावर प्रभावी भूमिका मांडली. समाजातील विविध घटकांशी समन्वय साधत हिरासिंग रामलाल राठोड यांनीही या विषयात सातत्यपूर्ण प्रयत्न करून लढ्याला दिशा दिली.

संत सेवालाल महाराज हे समाजजागृती, समता, त्याग आणि लोककल्याण यांच्या विचारांचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या कार्यातून समाजातील वंचित घटकांना नवी दिशा मिळाली. त्यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालयाचे नामांतर होणे ही केवळ औपचारिक बाब नसून समाजाच्या अस्मितेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.नामांतराचा निर्णय जाहीर झाल्यानंतर वाशिम शहरात आणि परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले. विविध सामाजिक संघटनांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले असून हा ऐतिहासिक क्षण असल्याचे मत व्यक्त केले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेत अधिकृत मान्यता दिल्याबद्दल समाजाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांना व नागरिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. संत सेवालाल महाराज यांच्या विचारांचा वारसा जपत समाजहिताच्या कार्यात नवे अध्याय लिहिले जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.एकूणच, वाशिमसाठी हा अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला असून “जय सेवालाल”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

Previous Post Next Post