महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री.... सुनेत्रा पवारांनी घेतली शपथ...
अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचा नवा गटनेता कोण होणार? नवे उपमुख्यमंत्री कोण असणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज राजभवानामध्ये राज्यपालांनी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली, त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील त्यांची निवड करण्यात आली आहे.
आज मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती, या बैठकीला पक्षाच्या सर्व आमदारांसह पक्षातील वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. या बैठकीमध्ये दोन प्रस्ताव मांडण्यात आले, पहिला प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवडी संदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव हा सुनेत्रा पवार यांना पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचा संविधानिक अधिकार मिळण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावाला या बैठीकेमध्ये मंजुरी मिळाली, सुनेत्रा पवार यांची या बैठकीमध्ये गटनेता म्हणून निवड करण्यात आली, त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रिपदापूर्वी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार होत्या.
