प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी संपन्न
भद्रावती | तालुका प्रतिनिधी - सुनील दैदावार : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग संचालनालयाच्या निर्देशानुसार दि. १७ जानेवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती यांच्या वतीने प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या तंत्रप्रदर्शनीत तालुक्यातील शासकीय व अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रशिक्षणार्थींनी आपल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य पी. व्ही. बालसराफ होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्या प्रणाली डहाटे (शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती) उपस्थित होत्या. तसेच चिल्लरवार, वराडे, पुनवटकर, नगराळे, दाते, आसेकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. आपल्या भाषणात प्राचार्या डहाटे यांनी तंत्रप्रदर्शनीचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध क्षेत्रांत आत्मविश्वासाने पुढे यावे, असे आवाहन केले.
तालुकास्तरीय तंत्रप्रदर्शनी सकाळी १० वाजता सुरू झाली.
तांत्रिक विभागात श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर प्रियदर्शिनी खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील प्रशिक्षणार्थ्यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले.
अतांत्रिक विभागात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तिन्ही क्रमांक पटकावले.
कार्यक्रमाचे संचालन स्वेताली वाकुलकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे निदेशक एन. ई. सय्यद यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थेचे सर्व निदेशक, शिक्षक व कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले.
