जनता कन्या विद्यालय नागभीड : गायडींग पथकाचे दोन दिवसीय निवासी शिबिर यशस्वीरित्या संपन्न....
नागभीड : जनता शिक्षण संस्था नागभीड संचलित जनता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्ग नववी व दहावीच्या विद्यार्थिनींच्या गायडींग पथकाचे दोन दिवसीय निवासी शिबिर चिखल परसोडी येथे नुकतेच यशस्वीपणे संपन्न झाले. या शिबिराद्वारे विद्यार्थिनींमध्ये श्रमसंस्कार, सांघिक भावना, नेतृत्वगुण, अनुकूलनशीलता व स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यात आले.
लॉर्ड बेडन-पॉवेल व लेडी बेडन-पॉवेल यांनी इंग्लंडमध्ये शेकडो वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गायडींग चळवळीचा भारतातही प्रसार झाला असून, ती विद्यार्थ्यांना कार्यकुशल, आत्मविश्वासपूर्ण, चारित्र्यसंपन्न व शिस्तप्रिय बनविण्याचे कार्य करत आहे. शिबिरात विद्यार्थिनींचा वचनविधी व शेकोटीचा कार्यक्रम पार पडला. पहिल्या दिवशी प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम झाले, तर दुसऱ्या दिवशी सकाळी कवायत व प्राणायामानंतर स्वच्छता संदेश मिरवणूक व परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
उद्घाटन व प्रमुख उपस्थिती
शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव डॉ. रविंद्र कावळे यांच्याहस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष अतुल चिल्लूरे, चक्रधर रोहणकर, सहसचिव रविंद्र समर्थ, कोषाध्यक्षा मनिषा चव्हाण, प्राचार्य श्रीकांत जाधव, सहाय्यक शिक्षक सतिश नरडंगे,धनू नेताम, रूपाली पाथोडे,सतिश मेश्राम व प्रतिष्ठित नागरिक अमित संदोकर उपस्थित होते. मान्यवरांनी गायडींगचे महत्त्व व विद्यार्थ्यांची जबाबदारी यावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अपेक्षा कायरकर ने केले तर मैथिली रहाटे ने आभार मानले.
या यशस्वी शिबिरासाठी गायडींग मार्गदर्शिका सुषमा रोहणकर, सोनाली दांडेकर,पुजा तलमले, जया भोयर, शिक्षक सुमीत राजुरकर, सुशील कामडी,विरेंद्र जाधव, शिक्षकेत्तर कर्मचारी, परसोडीतील संदोकर परिवार व गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. शिबिराने विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास व नवचेतना निर्माण झाली असून, गावकऱ्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.
