Top News

ग्रामगीता महोत्सवातून विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व जीवनमूल्यांचे ज्ञानामृत

 ग्रामगीता महोत्सवातून विद्यार्थ्यांना संस्कार, शिस्त व जीवनमूल्यांचे ज्ञानामृत





नागभीड : नवेगाव हुंडेश्वरी येथे गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थांच्या संयुक्त उपक्रमातून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा ग्रामगीता महोत्सव सप्ताह यंदाही उत्साहात पार पडला. या महोत्सवात जि. प. उच्च प्राथमिक शाळा, नवेगाव हुंडेश्वरीच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवित नैतिक व सामाजिक मूल्यांचे ज्ञान आत्मसात केले.

सप्ताहभर चाललेल्या या महोत्सवात ह. भ. प. उदाराम बावणे (प्रवचनकार, आरमोरी) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. दररोज प्रातःस्मरण, ग्रामस्वच्छता, सामूहिक प्रार्थना, ध्यान, रामधून आदी उपक्रम राबविण्यात आले. तसेच विविध विषयांवर मार्गदर्शकांचे प्रेरणादायी व्याख्यान ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरले. 



या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम, संचलन, प्रभातफेरी, ग्रामस्वच्छता व विविध वेशभूषा सादरीकरणातून सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण केली. ग्रामगीतेच्या पारायणातून विद्यार्थ्यांना नैतिकता, शिस्त व जीवनमूल्यांचे धडे मिळाले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक श्रीधर मेश्राम, नरेंद्र वासनिक, संजय येरणे, कु. मेघा गुरनुले (प्रेरक शिक्षिका), कु. नंदिनी नान्हे (प्रेरक शिक्षिका), शाळा मंत्रीमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष सुखरू गेडाम, सचिव चिंतामण बागडे यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ग्रामोन्नतीचा संकल्प अधिक दृढ केला. ग्रामगीता महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त व समाजभान रुजण्यास मदत होत असून ग्रामविकासाच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

Previous Post Next Post