विज्ञानाच्या शैक्षणिक साहित्याचा जादुई पेटारा’ मॉडेलने पटकावला प्रथम क्रमांक....मीनाताई माध्यमिक विद्यालयाच्या शिल्पा ठाकरे यांचे नागपूर विभागस्तरीय विज्ञान स्पर्धेत यश...
चंद्रपूर व नागभीड तालुक्याचा राज्यस्तरावर गौरव
नागभीड/नवखळा |शिक्षणातील गुणवत्ता संवर्धन व शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था (STATE SCERT), पुणे यांच्या वतीने राज्यभरातील शाळांमध्ये शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विविध ४३ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यातील ‘गणित व विज्ञानाच्या जादूगर’ या नागपूर विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन डायट वर्धा येथे दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी शुक्रवारी पार पडले. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांतून एकूण १८ शिक्षकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत मीनाताई माध्यमिक विद्यालय, नवखळा येथील विज्ञान शिक्षिका कु. शिल्पा ज्ञानेश्वर ठाकरे यांच्या ‘विज्ञानाच्या शैक्षणिक साहित्याचा जादुई पेटारा’ या अभिनव मॉडेलने प्रथम क्रमांक पटकावला. या यशाने त्यांनी राज्यस्तरावर झेप घेत चंद्रपूर जिल्ह्याचे तसेच नागभीड तालुक्याचे नाव चमकवले आहे. त्यांच्या जादुई पेटाऱ्याने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व शिकण्याची उत्सुकता वाढवण्याचे कार्य यशस्वी झाले असून, सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

