जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व; ११ नगरपरिषदांपैकी ७ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष
चंद्रपूर : जिल्ह्यातील विविध नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, यामध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. एकूण ११ नगरपरिषदांपैकी ७ ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. भाजपला २, शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाला १, तर गडचांदूर शहर विकास आघाडीला १ नगराध्यक्ष पद मिळाले आहे.
नगराध्यक्षपदाचे निकाल पुढीलप्रमाणे :
मुल नगरपरिषदेत काँग्रेसचे एकता समर्थ हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. राजुरा नगरपरिषदेत काँग्रेस व शेतकरी संघटना युती चे अरुण धोटे यांनी नगराध्यक्ष पद पटकावले आहे. नागभीड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या स्मिता खापर्डे यांची निवड झाली आहे. घुग्घूस नगरपरिषदेत काँग्रेसच्या दिप्ती सोनटक्के यांनी विजय मिळवला आहे.भद्रावती नगरपरिषदेत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे प्रफुल्ल चटकी यांनी नगराध्यक्षपदावर बाजी मारली आहे. वरोरा नगरपरिषदेत काँग्रेसच्या अर्चना ठाकरे विजयी झाल्या आहेत. ब्रम्हपुरी नगरपरिषदेत नगराध्यक्षपदी काँग्रेसचे योगेश मिसार यांची निवड झाली आहे.चिमूर नगरपरिषदेत भाजपच्या गीता लिंगायत या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत, तर भिसी नगरपंचायतीत भाजपचे अतुल पारवे यांनी नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. गडचांदूर नगरपरिषदेवर गडचांदूर शहर विकास आघाडी व शेतकरी संघटना युतीचे निलेश ताजने हे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. बल्लारपूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या अल्का वाढई यांनी नगराध्यक्ष पद पटकावले आहे. या निकालांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, काँग्रेसने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली मजबूत पकड सिद्ध केली आहे. आता सर्वच नगरपरिषदांमध्ये नव्या नेतृत्वाकडून शहर विकास, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ठोस निर्णयांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
