Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवावर सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया

चंद्रपूर जिल्ह्यातील पराभवावर सुधीर मुनगंटीवार यांची पहिली प्रतिक्रिया


गटबाजीस राज्य नेतृत्व जबाबदार; धानपट्ट्यातील आमदारांना मंत्रिपद न दिल्याचा फटका – मुनगंटीवार



चंद्रपूर : नगरपरिषद निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला झालेल्या दारुण पराभवानंतर माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील नेत्यांनी जिल्ह्यात गटबाजीसाठी पोषक वातावरण तयार केल्याचा गंभीर आरोप करत, नेतृत्वाच्या निर्णयांचा थेट परिणाम या पराभवावर झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“काँग्रेसने आपल्या नेत्याला ताकद दिली, तर भाजपने आपल्या नेत्यांची ताकद कमी केली. चंद्रपूर–गडचिरोली–गोंदिया–भंडारा या संपूर्ण धानपट्ट्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. मला मंत्रिपद न दिले तरी कुणालातरी हे पद द्यायला हवे होते. तसे न झाल्याने मतदारांमध्ये विकासाबाबतचा विश्वास कमी झाला असावा आणि त्यातूनच हा पराभव झाला,” असे मत मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

आज चंद्रपूर येथील एनडी हॉटेलमध्ये पंडित दीनदयाल कॅन्सर हॉस्पिटल, चंद्रपूरच्या उद्घाटनासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीला यश मिळत असताना चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला पराभव का पत्करावा लागला, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही स्पष्ट भूमिका मांडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीस राज्यातील नेतेच जबाबदार असल्याचा आरोप करत, “येथे गटबाजी आहे आणि त्या गटबाजीसाठी पोषक वातावरण राज्य नेतृत्वानेच निर्माण केले,” असेही ते म्हणाले. “शनिशिंगणापूरनंतर भाजप हा असा पक्ष झाला आहे की ज्या पक्षात येण्यासाठी कोणतेही दार नाही,” अशी उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी केली आणि या परिस्थितीवर गांभीर्याने चिंतन करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना मुनगंटीवार म्हणाले, “आमच्यापेक्षा काँग्रेसचे पदाधिकारी अधिक विकास करतील, असा विश्वास मतदारांना वाटला असावा आणि त्यामुळेच काँग्रेसला विजय मिळाला.” पुढील पाच वर्षे आम्ही दर्शक म्हणून त्यांच्या कामावर लक्ष ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

घरांचे पट्टे, कल्याण मंडप, ड्रेनेज व्यवस्था यांसारख्या नागरी समस्या सोडविण्याची जबाबदारी आता काँग्रेसची असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आमदार म्हणून आपण जनतेला दिलेली सर्व आश्वासने निश्चितपणे पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, भाजपच्या पराभवानंतरही पत्रकार परिषदेदरम्यान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या चेहऱ्यावर कोणतीही नाराजी दिसून आली नाही. तसेच, काँग्रेसकडून निवडून आलेले अनेक नगरसेवक येत्या एका वर्षात भाजपात प्रवेश करतील आणि त्यामुळे पक्षाची ताकद पुन्हा वाढलेली दिसेल, असा राजकीय अंदाजही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous Post Next Post