नागभीड वाहतूक पोलिसांचा मानवतेचा हात......गरजू नागरिकांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट वाटप.....
नागभीड : हिवाळ्याची तीव्रता वाढत असताना उघड्यावर राहणाऱ्या गरजू व निराधार नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळावा, यासाठी नागभीड वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक पोलीस कृणाल पतरंगे यांनी शहरातील विविध ठिकाणी गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप केले.
रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी व उघड्यावर वास्तव्यास असलेल्या वृद्ध व निराधार व्यक्तींना प्रत्यक्ष भेट देत ब्लँकेट वितरित करण्यात आले. थंडीमुळे होणारा त्रास कमी व्हावा आणि माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
पोलीस दल केवळ कायदा-सुव्यवस्था व वाहतूक नियंत्रणापुरते मर्यादित नसून सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबवित असल्याचे या कृतीतून दिसून येते. या उपक्रमाबद्दल नागरिकांकडून समाधान व कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.

