मनसेहून जय भवानीकडे झेप — रोहित बात्ताशंकर यांची युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती
सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेत तरुणांचा ऊर्जावान प्रवेश
जय भवानी कामगार संघटनेत नव्या पर्वाची सुरुवात! रोहित बात्ताशंकर यांची युवा शहराध्यक्षपदी नियुक्ती
राजुरा, ता. 30 ऑक्टोबर :
राजुरा शहरातील उत्साही तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकत जय भवानी कामगार संघटनेचा झेंडा हातात घेतला. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात तरुणांनी संघटनेच्या विचारधारेवर विश्वास ठेवून नव्या पर्वाची सुरुवात केली.
यावेळी रोहित बात्ताशंकर यांची जय भवानी कामगार संघटना, राजुरा शहर युवा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीप्रसंगी संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी त्यांना शुभेच्छा देत सांगितले की, “संघटना ही अन्यायाविरुद्धचा लढा देणारी चळवळ आहे. तरुणाईने एकत्र येऊन समाजातील जनतेच्या न्यायासाठी ठाम उभे राहणे गरजेचे आहे.”
गतवर्षी (23 ऑगस्ट 2024) रोजी रोहित बात्ताशंकर यांनी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन मनसेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची राजुरा तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक आणि जनसेवेच्या उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला.
मात्र, जनतेच्या तक्रारींवर तोडगा काढताना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे झालेल्या वादातून त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली. या प्रसंगी चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेचे वरिष्ठ नेते मागे हटल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली.
त्या काळात जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे यांनी त्यांना नैतिक व कायदेशीर मदतीचा हात दिला. त्यांच्या सातत्यपूर्ण जनसेवेच्या वृत्तीला आणि लढवय्या कार्यशैलीला प्रभावित होऊन राजुरा येथील तरुणांनी एकमुखाने जय भवानी कामगार संघटनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
या प्रवेश सोहळ्यात राज लड्डा, साहिल चौधरी, बालाजी चौधरी, यश डोंगरे, गणेश लांडे, विजय तलांडे, सागर मिसलवार, चेतन मेश्राम, आशिष वडसकर, साहिल कायडिंगे आदी तरुणांनी संघटनेत प्रवेश केला.
राजुरात झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे जय भवानी कामगार संघटनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण झाले असून शहरात संघटनेच्या विस्ताराला गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
