राष्ट्रीय अभियंता दिनीच दारू पार्टीत पकडले गेले जिल्हा परिषदेचे अभियंते.
आम आदमी पार्टीची धडक धाड. अभियंते लपण्याकरिता पळाले बाथरूमकडे.
चंद्रपूर : उपजिल्हा प्रतिनिधी | संदीप तेलंग - 9823737684 : राष्ट्रीय अभियंता दिनाच्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील अभियंत्यांचा गैरप्रकार समोर आला आहे.वसंत भवन विश्रामगृहातील खोली क्रमांक 107 मध्ये सहा ते सात अभियंते दारू पार्टी करताना रंगेहात पकडले गेले. या धाडसी कारवाईमुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. ही कारवाई आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
पथक अचानक विश्रामगृहात पोहोचले, तेव्हा खोलीत पार्टी जोरात सुरू होती. धाड पडताच उपस्थित अभियंते घाबरले आणि सैरावैरा पळू लागले.
काहींनी तर बाथरूममध्ये लपण्याचाही प्रयत्न केला. सुरुवातीला कुणीही आपली ओळख सांगायला तयार नव्हते. मात्र तपासणीदरम्यान अभियंत्यांची जिल्हा परिषदेची ओळखपत्रे सापडल्याने त्यांची ओळख पटली.
घटनेची माहिती तात्काळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांना देण्यात आली. चौकशीसंदर्भात विचारले असता सिंग म्हणाले, या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.
या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभियंता दिनासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा प्रकारचा गैरप्रकार उघड झाल्याने जनतेत संताप व्यक्त होत आहे. आम आदमी पार्टीने या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
