विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी खाजगी शिकवणी व शाळांमध्ये CCTV कॅमेरे सक्तीचे करावेत – राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
चंद्रपूर / जिल्ह्यातील सर्व खाजगी शिकवणी वर्ग, प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झांमरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात हजारो खाजगी शिकवणी वर्ग व शाळा-महाविद्यालये कार्यरत आहेत. लाखो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी येथे शिक्षण घेत असताना अनेकदा अनैतिक प्रकार, गैरप्रवृत्तीची उदाहरणे समोर येत असतात. भविष्यात अशा अनुचित घटना घडू नयेत यासाठी संबंधित संस्थांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यावश्यक आहे.
विशेषतः खाजगी शिकवणी वर्गांमध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर असून, नियंत्रण ठेवण्यासाठी व पारदर्शकता राखण्यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने यासंबंधी कठोर पावले उचलून सर्व संस्थांमध्ये सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करावे, अशी जोरदार मागणी झांमरे यांनी केली आहे. या वेळी सुरज चौबे,अभय वांढरे, ओम रायपुरे,बबलू बोराडे, सदम अन्सारी सह अन्य पधादिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
