सकाळच्या शांततेत मृत्यूची धडक; काटलीतील सहा मित्रांना भरधाव वाहनाची चिरड

सकाळच्या शांततेत मृत्यूची धडक; काटलीतील सहा मित्रांना भरधाव वाहनाची चिरड


काटली गावाजवळ भीषण अपघात – ४ तरुणांचा मृत्यू, २ गंभीर




गडचिरोली |  गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज गुरुवारी (दि. ७ ऑगस्ट) पहाटे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. मर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा तरुणांना भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून उर्वरित दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. दोघांनाही नागपूरला हेलिकॉप्टरने हलविण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, काटली गावातील सहा युवक नेहमीप्रमाणे सकाळी नाल्याजवळ व्यायामासाठी गेले होते. याच दरम्यान आरमोरीवरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एका भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. अपघात इतका भीषण होता की पिंकू नामदेव भोयर (वय १४) व तन्मय बालाजी मानकर (वय १६) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिशांत दुर्योधन मेश्राम व तुषार राजेंद्र मारबते यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उर्वरित दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून अधिक उपचारासाठी त्यांना हेलिकॉप्टरद्वारे नागपूरला हलविण्यात आले आहे.

ही हृदयद्रावक घटना घडताच परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळीच रास्ता रोको करत आरमोरी-गडचिरोली महामार्ग रोखून धरला. या आंदोलनामुळे वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. काटली, पोर्ला आणि साखरा येथील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मदतकार्य सुरू असून, वाहनाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिकांची मदत घेण्यात येत आहे.

या अपघातामुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, अल्पवयीन युवकांचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र शोककळा पसरली आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.