अपघातस्थळी शिक्षणमंत्रींची तत्काळ भेट

अपघातस्थळी शिक्षणमंत्रींची तत्काळ भेट 


गडचिरोली जिल्ह्यातील भीषण अपघातानंतर प्रशासनाची तात्काळ प्रतिक्रिया... मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर....



गडचिरोली, दि. ०७ ऑगस्ट – गडचिरोली-आरमोरी महामार्गावरील भीषण अपघातानंतर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबियांची भेट घेतली. मृतकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांनी शासनाकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. 



यापूर्वी, मंत्री भुसे यांनी एमआयडीसी हेलिपॅड येथे अपघातात जखमी झालेल्या तरुणांची विचारपूस केली. यातील दोन गंभीर जखमींना तातडीने नागपूर येथे हेलिकॉप्टरद्वारे हलविण्यात आले आहे. 



घटनास्थळी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनासोबत आपल्या व्यथा मांडल्या. महामार्गावरील वाढत्या वाहतुकीचा आणि अपघाताचा धोका अधोरेखित करत काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी केली. मंत्री भुसे आणि जिल्हाधिकारी पंडा यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेत संयम राखण्याचे आवाहन केले. 



जिल्हा परिषद सभागृहात मृत्यूमुखी पडलेल्या युवकांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले.

त्याचबरोबर, शिक्षण विभागाच्या अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून देखील नियमांनुसार तात्काळ लाभ मिळवून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.