स्मार्ट व आदर्श ग्राम कळमना आरोग्याच्या दिशेने पुढे; पोषण दिवसात महिलांचा सहभाग लक्षणीय
चंद्रपूर / राजुरा (मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी ) : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे जिल्ह्यातील स्मार्ट व आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाते. येथील ग्रामविकासासोबतच आरोग्यविषयक उपक्रमांनाही विशेष प्राधान्य दिले जाते. त्याच परंपरेत ग्रामस्थांच्या आरोग्य व पोषणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य विभाग उपकेंद्र पांढरपौनी व प्राथमिक आरोग्य केंद्र देवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्राम आरोग्य पोषण दिवस’ नुकताच संपन्न झाला. या उपक्रमाला आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपकेंद्र पांढरपौनीच्या डॉ. कोल्हे, ए.एन.एम. धांडे, आरोग्य सहाय्यक अंकुश जाधव, ग्रामसेविका शुभांगी कवलकर, सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका लताताई शिरसागर, आशा वर्कर कल्पना क्षिरसागर, तसेच ग्रामस्थ व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमात पोषण आहाराचे महत्त्व, संतुलित आहाराची गरज, तसेच बालक व महिलांच्या आरोग्यविषयक काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
ग्राम आरोग्य पोषण दिवसामुळे गावकऱ्यांमध्ये आरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूकता वाढली असून, गावाच्या ‘आदर्श ग्राम’ संकल्पनेला बळकटी मिळाल्याचे सरपंच वाढई यांनी सांगितले.
