रक्षाबंधनाला पर्यावरणाची जोड; नागभीडमध्ये रंगली ‘ईको फ्रेंडली राखी’ स्पर्धा.....
७२ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; नैसर्गिक विघटनशील वस्तूंमधून राख्यांची निर्मिती....
नागभीड : रक्षाबंधनाच्या पवित्र सणाचे औचित्य साधत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय, नागभीड येथील वनस्पतीशास्त्र (Botany) विभागातर्फे तालुका स्तरीय ‘ईको फ्रेंडली राखी’(Eco Friendly Rakhi) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळा व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत तब्बल ७२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. विविध नैसर्गिक व विघटनशील वस्तूंचा (Natural and biodegradable items) वापर करून तयार करण्यात आलेल्या राख्यांनी आकर्षणाचा केंद्रबिंदू गाठला.
स्पर्धेचे परीक्षण एस. जे. टी. महिला महाविद्यालय, नागभीडच्या प्राचार्या रेखा जिभकाटे व कर्मवीर विद्यालयाच्या वरिष्ठ शिक्षिका रजनी चीलबुले यांनी केले. निकालांमध्ये जनता ज्युनिअर कॉलेज, नागभीडच्या इयत्ता १२ वीतील कु. तनु नीलकंठ तरारे हिने तयार केलेल्या आकर्षक राखीला प्रथम पारितोषिक मिळाले. द्वितीय पारितोषिक ट्विंकल इंग्लिश स्कूल, नागभीडच्या इयत्ता १० वीतील कु. अर्चना केरामी हिला तर तृतीय पारितोषिक रा. म. गांधी महाविद्यालयातील बी.एस्सी. भाग-२ मधील श्रेया खोब्रागडे हिला जिंकता आले.
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. जी. डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास मोहतुरे यांनी विद्यार्थ्यांना राखीचा पौराणिक इतिहास सांगत पर्यावरणपूरक राखीचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे संचालन सहा. प्रा. डॉ. अंकुश कायरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहा. प्रा. धनंजय मडावी यांनी केले.
विजयी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ, आरमोरीचे सचिव मनोज वनमाळी, प्राचार्य, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी केले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सण साजरा करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
