बल्लारपूर शहरातील मुख्य मार्गावरून धावणाऱ्या मोठ्या ट्रकांमुळे अपघाताची भीती; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे वेगमर्यादा मर्यादित करन्याची मागणी
बल्हाशाह | प्रतिनिधी : बल्लारपूर शहरातून जाणाऱ्या मुख्य मार्गावरून सुरजागड कंपनीसह इतर मोठ्या ट्रकांचे सतत ये-जा वाढल्यामुळे परिसरातील नागरिकांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः शहराच्या मध्यभागातून जाणारा हा रस्ता शाळांच्या जवळून जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे.
प्रशांत झांमरे यांनी बल्लारपूर पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात ही गंभीर समस्या मांडली आहे. त्यांनी नमूद केले की, नवीन दहेली ते विसापूर टोल नाका दरम्यान अनेक शाळा आहेत. शाळेच्या वेळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रकची वर्दळ सुरू असते. त्यातच रस्त्याच्या कडेला ट्रक उभे राहत असल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत होत असून, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
निवेदनात अशी मागणी करण्यात आली आहे की, शाळा सुरू व सुटण्याच्या वेळेत ट्रक वाहनांना नो एंट्री जाहीर करण्यात यावी. तसेच शहराच्या हद्दीतून जात असताना अशा मोठ्या वाहनांची वेगमर्यादा २० किमी/तास इतकी मर्यादित करावी, जेणेकरून संभाव्य दुर्घटनांना आळा बसू शकेल.
या निवेदनाची प्रत मा. आमदार सुधीर मुनगंटीवार व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना सुद्धा पाठविण्यात आली आहे. नागरिकांनी प्रशासनाकडून लवकरच ठोस कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या वेळी सुरज चौबे, ओंकार रायपुरे, शुभम निमसटकर सह अन्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे कार्यकर्ते उपस्थित होते.
