जनता कन्या विद्यालय नागभीड येथे लोकशाही पद्धतीने मंत्रिमंडळाची स्थापन.....
नागभीड : येथील जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित, जनता कन्या विद्यालय येथे सत्र २०२४_ २५ करिता शालेय मंत्रिमंडळाची स्थापना लोकशाही पद्धतीने करण्यात आली.
विद्यार्थिनींना लोकशाही मूल्यांची जाणीव व्हावी, मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी , सोबतच स्वतःची कर्तव्य व अधिकार या बाबींची जाणीव व्हावी, शालेय कार्य व शिस्त योग्य पद्धतीने राबविण्यात विद्यार्थिनींचा सहभाग असावा या उद्देशाने प्रत्यक्ष ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया घेऊन शालेय मंत्रिमंडळातील शालेय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची निवड करण्यात आली.
ही निवडणूक प्रक्रिया पार पाडीत असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर शेवटच्या मतमोजणी पर्यंत सर्वच बाबी ह्या प्रत्यक्ष लोकशाही पद्धतीने राबविण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान अधिकारी यांची निवड करण्यात आलेली होती मतदाना करिता दोन बूथ तयार करण्यात आले होते. मुख्यमंत्री पदाकरिता वर्ग नववी व दहावीतून एकूण सहा विद्यार्थिनींनी नामांकन अर्ज दाखल केलेले होते व त्यानंतर त्यांनी वर्गा वर्गात जाऊन प्रचार सुद्धा केला. या निवडणुकीत सर्वाधिक मते घेऊन वर्ग दहावीची विद्यार्थिनी कु. नयना शंभू बगमारे ही मुख्यमंत्री म्हणून निवडून आली तर श्रद्धा महेश गायधने ही उपमुख्यमंत्री व संस्कृती प्रदीप नांदगुरवार हीची मंत्रिमंडळ प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.
निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता शालेय मंत्रिमंडळ प्रमुख सतीश मेश्राम, वीरेंद्र जाधव यांनी पुढाकार घेतला तर ही निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी सहाय्यक शिक्षक सतीश नरडंगे, सुमित राजूरकर, सुशील कामडी, अतुल मेश्राम सोनाली दांडेकर, सुषमा रोहणकर, जया भोयर, संजय नवघडे यांनी मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. विद्यालयाच्या प्राचार्य आर.आर तरारे व पर्यवेक्षक एस. डी. जाधव यांनी शालेय मंत्री मंडळातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.