रुग्णसेवेची सामाजिक बांधिलकी : लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशन कडून आयुष्मान आरोग्य मंदिरात खुर्च्या भेट
नागभीड (ता.प्र.) – नागभीड येथील सुलेझरी वसाहतीतील आयुष्मान आरोग्य मंदिर – शहरी आरोग्य वर्धिनी केंद्रात रुग्णांना बसण्यासाठी खुर्च्यांची अनुपलब्धता असल्याची माहिती मिळताच, सामाजिक भान ठेवत लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशन तर्फे तत्काळ पाऊल उचलण्यात आले.
फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडिया यांचे मार्गदर्शनात रुग्णालयात भेट देऊन रुग्णांच्या सोयीसाठी खुर्च्यांची भेट दिली. या उपक्रमात प्रियंका कोरे, पराग गुंडेवार, हुमेश अमृतकर, माजी नगरसेविका व माजी आरोग्य सभापती अर्चना मारकम, डॉ. वैभवी काटेखाये, सिद्रा मिर्झा, रोहित चौधरी, रितेश गोडे, रीत्विक मेश्राम, तेजस सोनटक्के, विजय दैवलकर, साहिल अमृतकर यांचा सक्रिय सहभाग होता.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशन सातत्याने नागरी आरोग्य केंद्रे, सामाजिक गरजांच्या ठिकाणी मदतीचा हात पुढे करत आहे. या उपक्रमाबद्दल स्थानिक रुग्ण, नागरिक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरलेल्या या उपक्रमामुळे लोटस डायनॅमिक्स युथ फाउंडेशनचे कार्य पुन्हा एकदा समाजाच्या केंद्रस्थानी आले आहे.